मी अगदी सामान्य माणूस आहे. जसं बऱ्याच जणांना गाणी आवडतात, खाणं आवडतं तसंच मलाही आवडतं. तसंच लाँग ड्राइव्हही मला आवडतं. मला त्यातून समाधान मिळतं. एखादा मित्र असेल तर त्याला घेऊन जातो किंवा परिचयाचं कुणी म्हणालं तरीही मी लाँग ड्राइव्ह करतो. मी संपूर्ण भारत अशा पद्धतीनेच पाहिला आहे. मला त्यातून मानसिक समाधान मिळतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच मराठा आंदोलनाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
देवाभाऊ पोस्टरबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवाभाऊ पोस्टरबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे पोस्टर आमच्या पक्षाने लावलं होतं. त्यात वाद निर्माण करण्यासारखं काही नव्हतं. तरीही विरोधकांना मिरची लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन आपलं सैन्य तयार केलं होतं. मराठा समाजाचा एक मोठा इतिहास आहे त्यामुळे त्या समाजाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पण कुणाकडेच दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत आम्ही जो निर्णय केला तेव्हा मराठा समाजाला फायदा झाला. पण ओबीसी समाजाला भीती वाटू लागली की त्यांचं आरक्षण कमी होईल. पण आम्ही तसं केलं नाही. त्या पोस्टरचा अर्थ इतकाच होता की महाराजांच्या विचारांवरच आम्ही चालतो आहोत. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच आम्ही जात आहोत. ज्यांना जातीयवाद दिसतो त्यांना त्रास झाला. तसंच सहयोगी पक्षांनाही काहीही त्रास झाला नाही हे मी स्पष्ट करु इच्छितो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ब्राह्मण मुख्यमंत्री असल्याचा तुम्हाला राजकीय त्रास झाला आहे?
देवेंद्र फडणवीस तुम्ही ब्राह्मण असणं आणि मराठा आंदोलन याचा तुम्हाला त्रास झाला का? हे विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, जात-धर्म या सगळ्या गोष्टी नेत्यांच्या मनात आहेत. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचं काम नेते करतात. मला ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जातं. अनेक नेते बोलत असतात. पण महाराष्ट्रातल्या जनतेने हे दाखवून दिलं आहे की ते जात-पात-धर्म पाहात नाहीत. मोदींनी जेव्हा मला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय धाडसाचा होता. ब्राह्मण नेत्याला मुख्यमंत्री करणं योग्य होणार नाही असं त्यावेळी वाटत होती. मात्र आम्ही मोदींच्या नेतृत्वात २०१४ ची निवडणूक, २०१९ निवडणूक, २०२४ निवडणूक जिंकलो. जनतेने हे स्पष्ट केलं की त्यांच्या मनात जात किंवा धर्म नाही. नेत्यांच्या मनात जात धर्म आहे. मी ब्राह्मण आहे म्हणून मला मुख्यमंत्री करायचं नसतं तर जनतेने सलग तीन निवडणुकांमध्ये १०० हून जास्त जागा मिळाल्या. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली त्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंच्या माणसांकडून निधी?
मनोज जरांगे पाटील यांना निधी कोण देतं? असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मनोज जरांगेंना कोण निधी पुरवतं त्याची माहिती आमच्याकडे येत असते. मात्र कुठली यादी वगैरे काही नाही. मी त्यावर फार बोलणार नाही. मात्र एकनाथ शिंदे, अजित पवार हे कायमच माझ्यासह होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांनी मनोज जरांगेंना पैसे पुरवले अशी कुठली माहिती माझ्याकडे आलेली नाही.” यानंतर एकनाथ शिंदेंशी तुमचे राजकीय संबंध कसे आहेत? हे विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले संबंध चांगलेच होते आणि आहेत. कुणीही चिंता करु नये कारण माझं त्यांचं नातं चांगलंच राहणार आहे. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
