संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक अखेर बिनविरोध झाली. विधानसभा निकालानंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल चांगलेच वाढले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले होते. मात्र अनेक जुन्या संचालकांना यावेळी नारळ देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती बदलल्याचा संदेशही या निवडणुकीतून गेला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यात आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच कारखान्यासह आगामी सर्व निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याची घोषणा आमदार खताळ यांनी त्यावेळीच केली होती. कारखाना निवडणुकीचे वारे सुरू होताच त्यांनी बैठका घेत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले. निवडणुकीतून सपशेल माघार घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. त्यावेळीच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली. तरीही एक दोन गटांमध्ये निवडणूक होते की काय असे वाटत होते. मात्र आता संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. माजी मंत्री थोरात यांचे बंधू इंद्रजीत हे संचालक मंडळात कायम राहिले आहेत. मागील वेळी वगळलेले ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. अकोल्यातील थोरात समर्थक ज्येष्ठ काँग्रेस नेते सोन्याबापु वाकचौरे यांचे चिरंजीव अरुण यांचाही नव्याने समावेश झाला आहे. गेल्या काही पंचवार्षिक संचालक मंडळात कायम राहिलेले तरुण कार्यकर्ते रमेश गुंजाळ यांना वगळणे देखील आश्चर्यकारक मानले जाते. या निवडणुकीत १३३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. मात्र थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर विभागाचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी काम पाहिले.

असे आहे नवे संचालक मंडळ

सोसायटी मतदारसंघ ~ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, साकुर गट – इंद्रजीत खेमनर, सतीश वर्पे चंद्रभान, रामदास धुळगंड, जोर्वे गट – इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विलास शिंदे, तळेगाव गट – संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, नवनाथ अरगडे, धांदरफळ गट – पांडुरंग घुले, विजय राहणे, विनोद हासे, अकोले जवळे  गट – गुलाब देशमुख, संतोष हासे, अरुण वाकचौरे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ – योगेश भालेराव, महिला राखीव मतदार संघ – लता गायकर व सुंदरबाई डुबे रावसाहेब, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघामधून दिलीप नागरे व इतर मागासवर्गीय मतदार संघामधून अंकुश ताजने यांचा नवनियुक्त संचालक मंडळात समावेश आहे.
__
विखेंच्या ‘ प्रवरा ‘ पाठोपाठ ‘ थोरात ‘ कारखानाही बिनविरोध

पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या आजी माजी मंत्र्यांमध्ये लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष झाला. त्यातूनच लोकसभेला डॉ. सुजय विखे तर विधानसभेला बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर संगमनेरचा थोरात कारखाना आणि मंत्री विखे यांच्या प्रवरा कारखान्याच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर झाल्या होत्या. दोन्ही नेत्यांमधील मागचा संघर्ष बघता दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतु सहकारामध्ये सहमती एक्सप्रेस घडवून आणल्याने प्रवरा आणि थोरात दोन्ही कारखाने बिनविरोध झाल्याचे मानण्यात येते. ही सहमती घडवून आणण्यात सत्ताधारी पक्षातील राज्यातल्या एका वरिष्ठ नेत्याचा सहभाग असल्याचेही समजते.

सहकारी साखर कारखाना हा राज्यातील उत्कृष्ट कारखाना आहे. सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व नागरिकांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. मात्र कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. चांगल्या राजकारणाची परंपरा या सर्वांनी जपली आहे. यापुढेही हीच समृद्ध वाटचाल ठेवून सर्वजण एकत्रित चांगले काम करतील. माजी मंत्री बाळासाहेब थोरात