राज्यातील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ‘चिंतन’ सत्र संपताच, स्वत: राजकीयदृष्टय़ा चिंतेत असतानाही काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्षांना पाचारण करून निवडणुकीतल्या कामगिरीबद्दल तसेच अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याच्या बाबीवरून सर्वाची झाडाझडती घेतली.
लोकसभा निवडणुकीत चव्हाण ८० हजारांहून जास्त मतांनी निवडून आले तरी मुखेड, नायगाव मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले. भोकर मतदारसंघात अपेक्षेएवढे मताधिक्य त्यांना मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या अंतर्गत यंत्रणेने सोमवारच्या बैठकीत ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’द्वारे विधानसभा मतदारसंघनिहाय लेखाजोखा सादर केला. अनेकांनी मोदींचे नाव पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी कोणावर थेट ठपका ठेवला नाही. पण अनेक भागांत कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले नाही, मेहनत घेतली नाही, असे निदान चव्हाण यांनी केले. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आहे, याकडे आमदार व तालुकाध्यक्षांचे लक्ष वेधून सर्वानी आता झटले पाहिजे, लोकांमध्ये गेले पाहिजे, अशी तंबी चव्हाण यांनी दिल्याचे समजते.
चव्हाण सोमवारी दुपारी मुंबई-दिल्ली दौऱ्यावरून परतले. पण विश्रांती-आराम न घेताच कामाला लागले. आमदार, तालुकाध्यक्ष तसेच जि.प. अध्यक्ष व महापौर आदींना बैठकीची सूचना आधीच देण्यात आली. पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर या ‘चिंतन’ बैठकीत होते. आमदार ओमप्रकाश पोकर्णा वगळता सर्व आमदार उपस्थित होते. पण माजी खासदार गैरहजर होते. चव्हाण यांनी आमदार व तालुकाध्यक्षांना त्यांच्या भागाचा आढावा सादर करायला सांगितले. कोणी लिंगायत समाजाचा, कोणी धनगर-वंजारी समाजाचा तर कोणी मन्न्ोरवारलू समाजाच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला. किशोर स्वामी यांना दिले गेलेले महत्त्व पाहून त्यांना लिंगायत समाज मानत नाही, असेही मत मांडण्यात आले. जिल्हाध्यक्षांच्या गावात आघाडी न मिळाल्याच्या बाबीचा ठपका ‘भाऊराव चव्हाण’च्या एका संचालकावर टाकला गेला. अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा मुद्दा काही लोकप्रतिनिधींनी मांडला. ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपैकी कोणी साथ दिली, कोणी लाथ मारली यावर चर्चा झाली. कुंटूर, बरबडा, गोरठा या सर्कलमध्ये आघाडी मिळाली नाही, याकडे नायगाव मतदारसंघातल्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
अनेक नगरसेवक, जि. प. सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी झटून काम केले नाही. त्यामुळे मताधिक्य कमी झाले, असे चव्हाण यांनी नमूद केले. शहरात मुस्लिमबहुल भागात मताधिक्य असले तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्यात यश आले नाही, याकडे त्यांनी महापौरांचे लक्ष वेधले. विधानसभा निवडणुकीसाठी खूप कमी कालावधी राहिला असल्याने लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दोष दुरुस्त करावेत, जेथे आपण कमी पडलो, त्या भागात लक्ष घालावे. मी स्वत: प्रत्येक मतदारसंघात वेळ द्यायला तयार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली, पण बैठकीबद्दल गुप्तता पाळण्यात आली.