सोलापूर : बालाजी अमाईन्स कपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) एक कोटी २७ लाख रुपये खर्च करून सोलापुरात रूपाभवानी स्मशानभूमीत उभारलेली विद्युतदाहिनी महापालिकेकडे हस्तांतरीत करताच बंद पडली आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडलेली ही विद्युतदाहिनी तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी केली जात आहे. 

हेही वाचा >>> सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात दीड कोटी खर्चूनही ध्वनियंत्रणा सदोष; तज्ज्ञांकडून चाचणी

तीन वर्षांपूर्वी करोना महासाथीच्या संकटात करोनाबाधित रूग्णांचा मृत्युतांडव सुरू झाले असता महापालिकेच्या मोरे हिंदू स्मशानभूमीत अस्तित्वात असलेल्या जुन्या विद्युतदाहिनीवरील भार वाढला होता. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहून तुळजापूर रस्त्यावरील रूपाभवानी मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमीत बालाजी अमाईन्स  कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) एक कोटी २७ लाख रूपये खर्च करून नवीन अद्ययावत विद्युतदाहिनी उभारली होती. याशिवाय श्रध्दांजली सभागृह, प्रतीक्षालय,  पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र स्वच्छतागृह, छोटेखानी उद्यान, वीजव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या.

हेही वाचा >>> चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

या नवीन अद्ययावत विद्युतदाहिनीचे २६ जानेवारी २०२२ रोजी लोकार्पण झाले होते. नंतर विद्युतदाहिनी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. तत्पूर्वी, बालाजी अमाईन्स कंपनीच्यावतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला होता. देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत ५  जानेवारी २०२४ रोजी संपली. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून तेथील विद्युतदाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते केतन व्होरा यांनी पालिका प्रशासनाच्या गलथानपणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

आठवड्यात विद्युतदाहिनी दुरूस्त होईल) रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे. येत्या आठवडाभरात दुरूस्त करून विद्युतदाहिनी पूर्ववत सुरू केली जाईल.-महादेव इंगळे, विद्युत अभियंता, सोलापूर महापालिका