विजेच्या नव्या जोडणीसाठी जीटीएलकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प्समवेत नाहक कागदपत्रे घेतली जात असल्याचा आक्षेप ऊर्जा मंचच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे नोंदविण्यात आला आहे. नव्या जोडणीसाठी कारण नसताना २५० रुपये अधिक खर्च करावे लागत आहे. हा भरुदड ग्राहकांना का लावला जात आहे, असा सवाल ऊर्जा मंचने उपस्थित केला आहे. जीटीएल या कंपनीकडून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे.
नव्या वीजजोडणीसाठी कोणकोणती कागदपत्रे असावीत, याची यादी आयोगाने सांगितल्यानुसार वेगळी आहे. जीटीएल मात्र काही वेगळीच कागदपत्रे मागवत आहेत. अर्जदाराचा फोटो, शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपरवर काही जुनी देणी असल्यास ती वसूल करण्याचा अधिकार, जागेच्या अनुषंगाने झालेली खरेदीची कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रे सादर करताना स्वत: अर्जदाराला उपस्थित राहावे लागेल, असे जीटीएलचे अधिकारी सांगत आहेत. वास्तविक शंभर रुपयाचा बॉण्ड व नोटरी करण्यासाठी दीडशे रुपये, असा अडीचशे रुपयांचा खर्च नाहक आहे. या अनुषंगाने ऊर्जा मंचचे हेमंत कपाडिया यांनी तक्रार देऊनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ई-मेल अथवा पोस्टाने पाठविलेले अर्जही जीटीएलकडून स्वीकारले जात नसल्याने वीज नियामक आयोगाच्या सचिवाने या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.