कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी सुब्राव जाधव यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार भेट घेणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर जाधव यांच्या घरी तब्बल वर्षांनंतर वीजजोडणी करण्यात आली. मात्र, महावितरणने दाखविलेल्या या तत्परतेविषयी उपस्थितांमध्ये चर्चा होत होती.
तानाजी जाधव यांनी नापिकीला कंटाळून व खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून ३१ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव कुटुंबीयांचे गावाजवळच पत्र्याचे घर आहे. मागील वर्षांपूर्वी जाधव यांनी महावितरणकडे वीजमीटर बसविण्याची मागणी केली होती. परंतु वारंवार चकरा मारूनही महावितरणने त्यांच्या घरी वीजजोडणी केली नाही. मात्र, चार महिन्यांनी जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार येणार असल्याने महावितरणनेही सायंकाळी पाचलाच वीजपुरवठा सुरू केला.
‘सत्तेत नसलो तरी शेतकऱ्यांबरोबर’
संकटे येतच असतात, मात्र संकटावर मात करण्याची तयारी पाहिजे. परंतु सध्या दुष्काळी संकट पाणी नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात बिकट होत आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कन्हेरवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी जाधव यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जाधव यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, तुटपुंजी मदतही न देता त्यांना कायमस्वरूपी मदत कशी मिळेल, यासाठी कळंब तहसीलदार यांनी विनापरवाना या शेतकऱ्याची जमीन खरेदीखत करून गहाण ठेवलेल्या सावकारावर कडक कारवाई करावी व जाधव यांची जमीन त्यांना परत मिळवून द्यावी, अशी मागणी केली.
गावात झालेल्या बठकीत पवार यांनी सांगितले, की आजची परिस्थिती अशी आहे, की आज केवळ १० टक्के ऊस राहिला आहे. पाणी नसल्यामुळे ऊस नाही. असला तरी उसाला भाव नाही. त्यामुळे साखर व्यवसाय तोटय़ात जात आहे. त्यामुळे जवळपास ७० टक्के साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दुधाबाबतही अशीच स्थिती आहे. दुधाला १६ रुपये भाव मिळतो. पण जनावरांचा कडब्याचा भाव मात्र गगनाला भिडला आहे. त्यातच त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. हेच शेतकरी आज जनावरांना टँकरने पाणी पाजून जगवत आहेत. त्यामुळे दुधाच्या भाववाढीविषयीही आम्ही लढा देणार आहोत. आज फक्त आम्ही या सरकारला आपले प्रश्न सांगणार आहोत. पण हे प्रश्न या सत्ताधाऱ्यांनी सोडवले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2015 रोजी प्रकाशित
पवारांच्या भेटीपूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरामध्ये वीजजोडणी!
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी सुब्राव जाधव यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार भेट घेणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर जाधव यांच्या घरी तब्बल वर्षांनंतर वीजजोडणी करण्यात आली.

First published on: 02-06-2015 at 01:40 IST
TOPICSउस्मानाबादOsmanabadटूरTourमहावितरणMahavitaranवीजElectricityशरद पवारSharad PawarशेतकरीFarmers
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity in farmers of suicide affected before tour of sharad pawar