जालना : डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील सर्व रेल्वे ब्रॉडगेज मार्गावर विद्युत इंजिनाच्या गाडय़ा धावतील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या मार्गावर धावणारी डिझेलची इंजिने बंद झाल्यामुळे खर्चात बचत तर होईलच आणि पर्यावरणाचे नुकसानही टळेल, असे दानवे यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी म्हटले आहे, की अगदी कालपर्यंत जम्मू-काश्मीर आणि देशाच्या ईशान्य भागात बहुतांश रेल्वे सेवा पोहोचली नव्हती. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गासाठी ३५ हजार कोटी रुपये उपलब्ध करवून दिले. या खडतर कामामुळे उधमपूरचा नागरिक थेट कन्याकुमारीशी जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्यांना जोडणारा ‘कॅपिटल कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जवळपास एक लाख कोटींचे अर्थसाह्य यासाठी उपलब्ध करवून देण्यात आलेले आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंजाब ते जेएनपीटी मुंबई तसेच कोलकातादरम्यान ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ आकारास येत आहे. फक्त मालवाहतुकीच्या सेवेसाठी हा मार्ग असेल. ‘किसान रेल्वे’च्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या जानेवारीपर्यंत मध्य रेल्वेने ‘किसान रेल्वे’च्या ९०० फेऱ्यांच्या माध्यमातून तीन लाख टनांपेक्षा अधिक नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वेगाडय़ातील तसेच स्थानकांवरील स्वच्छतेकडे लक्ष देऊन बायोटॉयलेट सुरू करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गास नीती आयोगाची मान्यता मिळाली आहे. या ‘सेमी हायस्पीड’ मार्गाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा विषय सोडविण्यात आला आहे. जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.