सांगली : छत्रपती शिवाजी महाराज मंडई लगत ठाण मांडून असलेला भाजी बाजार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १२ सिमेंट कट्टे उद्ध्वस्त करत तीन हातगाड्या जागीच मोडून हा रस्ता सार्वजनिक रहदारीस खुला केला. उप आयुक्त वैभव साबळे यांनी समक्ष जागेवर थांबून या कारवाईचे नेतृत्व केले आहे.
सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या दक्षिणेला गरवारे कन्या महाविद्यालयालगत भाजी विक्रेत्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून ठाण मांडले असून हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीस बंदच होता. आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील सार्वजनिक रस्ते वाहतुकीस खुले ठेवण्याचे निश्चित केले असून त्या दृष्टीने उपायुक्त वैभव साबळे यांना सूचना दिल्या.
आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारे कन्या महाविद्यालय या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता नागरिकांच्या साठी खुला केला आहे, या पुढे देखील तो नागरिकांचा साठी खुला राहील असे नियोजन केले आहेउप आयुक्त श्री. साबळे यांनी समक्ष जागेवर थांबून सदर कारवाईचे नेतृत्व केले आहे. भाजीविक्रेत्यांनी स्थायी स्वरूपात रस्त्यावर बांधलेले १२ कट्टे उध्वस्त करीत तीन हातगाड्या जागेवर तोडून नष्ट केल्या.
शहरातील भाजीपाला व अन्य पथविक्रेत्यांसाठी खुल्या भूखंडावर बसण्याचे नियोजन केले आहे, प्रभाग समिती निहाय नियोजन करण्यात येणार आहे, सर्व विक्रेते यांना विडासात घेऊन सदरची कार्यवाही पुढील काळात केली जाणार आहे, फेरीवाला धोरण,अन्य मार्गाने त्याचे पुनर्वसन नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्री. गांधी यांनी सांगितले.