वाढीव वीजदर वाढीच्या विरोधात आज जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या संघटनांच्या वतीने महावितरणवर मोर्चा काढण्यात आला. वाढीव वीज बिलाची होळी केली, तर वीजदर वाढ मागे न घेतल्यास राज्यातील उद्योग बंद पडतील अथवा अन्य राज्यात स्थलांतर करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
सासने ग्राऊड येथून मोर्चास सुरवात झाली. यामध्ये शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, कोल्हापूर इंजिनिअिरग असोसिएशन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज, द इस्टिटय़ूट ऑफ इंडिया फौंड्रिमन आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. महावितरणचे मुख्य अभियंता शंकर िशदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील सर्व वीजग्राहकांचे वीजदर गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढत आहेत. ऑगस्ट २००९ ते मार्च २०१४ पर्यंत १४ वेळा वीजदरवाढ करण्यात आली. राज्यातील सर्व २ कोटी १५ लाख वीजदरग्राहकांचे दर सरासरीने दुप्पट वा अधिक झाले आहेत. ही वाढ सुमारे २४०० कोटी रुपयांहून अधिक आहे.
मागील राज्य सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून वाढीव अतिरिक्त अनुदान दरमहा ७०६ कोटी रुपये दिले होते. ते आता बंद केल्याने सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. इतर राज्याच्या तुलनेत ती दीडपट आहे.
उद्योग, शेती व यंत्रमाग हे राज्याला अधिक महसूल देत आहेत. त्यामुळे त्यांचा वीजदर इतर राज्याच्या तुलनेत असावा. अन्यथा दरवाढीचा परिणाम विकासावर होणार आहे. राज्य शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून नसíगक अपत्तीच्या वेळी हजारो कोटी रुपयांची मदत केली आहे. आता लघु व मध्यम उद्योगावर वीज दरवाढीच्या रूपाने आपत्ती आली आहे. ती दूर करण्यासाठी सबसीडी द्यावी किंवा वीजदर कमी करून उद्योग जिवंत राहण्यासाठी मदत करावी.
कोल्हापूर विभागामध्ये राज्याच्या तुलनेत वीजगळती कमी आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना विशेष सवलती द्याव्यात, टेक्सटाईल उद्योगाच्या धर्तीवर फौंड्री उद्योगाला दर लागू करावेत, कोल्हापुरातील फौंड्री उद्योगामुळे मोठा रोजगार आहे. जर वीज दर पूर्ववत केली नाही तर उद्योग बंद पडतील व स्थलांतरित होतील, याचा गांभीर्याने विचार करून निर्णय व्हावा, अशी मागणी केली आहे.
या वेळी आयआयएफचे चेअरमन विलास जाधव, कोल्हापूर चेंबरचे चेअरमन आनंद माने, मॅकचे चेअरमन मोहन कुशिरे, केईएचे चेअरमन रवींद्र तेंडुलकर, गोशिमाचे चेअरमन अजित आजरी, स्मॅकचे चेअरमन सुरेद्र जैन आदींसह उद्योजक मोर्चात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrepreneurs warning of emigration if do not revocation electricity
First published on: 28-02-2015 at 03:30 IST