सातारा : सज्जनगडावर आता पारंपरिक कपडे परिधान केलेल्या महिलांनाच प्रवेश मिळणार आहे. ज्या महिला व पुरुष तोकडे कपडे घालून येतील, त्यांना बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक परंपरेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे श्री रामदास स्वामी संस्थानाचे अध्यक्ष भूषण स्वामी यांनी कळवले आहे.

सज्जनगड हे समर्थ रामदास स्वामींचे समाधिस्थान आणि प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. दर वर्षी लाखो भाविक येथे येतात. परंतु, अलीकडच्या काळात गडाच्या पवित्र वातावरणाला बाधा येईल अशा वेशभूषेत छायाचित्रे व चित्रफिती बनविल्याच्या तक्रारी संस्थानाकडे वारंवार येत होत्या. त्यास गांभीर्याने घेत संस्थानाने महिलांच्या पोशाखासंदर्भात नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्टायलिश’ कपडे म्हणजे काय याची व्याख्याही संस्थानच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात महिला, मुलींनी सज्जनगडावर येताना तोकडे कपडे (शॉर्ट पॅण्ट, शॉर्ट ड्रेस, स्लीव्हलेस), पुरुषांनी बर्म्युडा घालून येऊ नये. हे कपडे ‘स्टायलिश’ कपड्यांमध्ये गणले जाणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना गडावर प्रवेश नाकारला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.