राज्याचे लक्ष लागून असलेला बीड मतदारसंघात मोठय़ा नेत्यांचे प्रचारदौरे, शरद पवार व गोपीनाथ मुंडेसारख्या नेत्यांचा मुक्काम, प्रचार सभांचा बंदोबस्त आणि उमेदवारांच्या खर्चाचे ताळमेळ यात हैराण असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने निवडणूक सुटकेचा श्वास सोडला.
बीड लोकसभा मतदारसंघात ११ तालुके असल्याने प्रशासकीय यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या संवेदनशील मतदारसंघात निवडणुकीदरम्यान राडय़ाची परंपरा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी या नव्याने आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा कस लागला. प्रादेशिक पोलीस महानिदेशक यांनीही दोन दिवस जिल्ह्य़ात तळ ठोकला होता. खा.मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीने राजकीय ताकद पणाला लावल्यामुळे कृषिमंत्री शरद पवार यांनी तब्बल दोन मुक्काम केले. परळीपासून आष्टीपर्यंत सर्व तालुक्यात सभा आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत जिल्हा िपजून काढला. भाजपसाठी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, प्रवक्ते शहेनवाज हुसेन, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज प्रचारासाठी आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे राज्य पातळीवरील इतर नेतेही धडकले. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढला होता. मात्र महसूल यंत्रणेने कौशल्य पणाला लावून निवडणूक शांततेत पार पाडली. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत कार्यालयात व्यस्त असल्याचे चित्र कायम होते. मताच्या ध्रुवीकरणासाठी तब्बल ३९ उमेदवार उभे राहिल्याने या उमेदवारांच्या खर्चाचा ताळेबंद, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करताना यंत्रणेची अनेकदा दमछाक झाली.