सांगली : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कुंडल व मिरजेतून जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. पूरग्रस्त भागातील पशूसाठी चारा सलगरे (ता. मिरज) येथून पाठविण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ तालुक्यामध्ये आलेल्या पुरामळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी कुंडल येथून आमदार अरूण लाड सोशल फौंडेशनच्यावतीने मदत साहित्य पाठविण्यात आले. पूरग्रस्त भागामध्ये ५०० कुटुंबांना प्रत्येकी तांदूळ, गहू पीठ, साखर, शाबू, शेंगदाणे, वरी, बटाटा चिप्स, चहा पावडर, काडीपेटी, कपड्याचे साबण, अंघोळीचे साबण अशा विविध वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील भीषण पूरस्थिती पाहता राज्याचा नागरिक व लोप्रतिनिधी या नात्याने आ. अरुण लाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी स्वरूपात देऊ केला असल्याची माहिती फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दिली.

यावेळी आ. अरुण लाड सोशल फौंडेशनचे सर्जेराव खरात, वैभव लाड, नितीन जाधव, प्रशांत आवटे, प्रतीक पाटील, इंद्रजित पवार, संदीप मुळीक, शिवराज शेळके, सागर शिंदे, स्वप्निल पाटील, रोहित कोळी, गुरुप्रसाद लाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मिरज विधानसभा मतदारसंघामधून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिक, शेतकरी तसेच जनावरांना चारा, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे, तांदूळ, गहू, ज्वारी, बिस्किटे, ब्लँकेट इत्यादी साहित्य पाठविण्यात आले. यावेळी आमदार सुरेश खाडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुरेश आवटी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पूरग्रस्तांसाठी मिरजेतून तांदूळ, गहू, ब्लँकेट, साखर, बिस्किटे, खाद्यतेल, साबण, डाळ, आटा, पोहे आदींसोबत औषधे व जनावरांसाठी चारा पाठविण्यात आला.

तसेच सलगरे गावातून जनावरांसाठी चारा मालट्रकने रवाना करण्यात आला. तानाजी पाटील यांच्या पुढाकाराने गावातून चारारूपी मदत संकलित करून ती सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सोलापूर व मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मदत आली होती. तर करमाळा येथील उजनीमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी घेऊन पूरग्रस्तांना पुरातून बाहेर काढण्यासाठी अनेक तरुण आले होते. याची जाणीव ठेवून कृष्णाकाठी असलेल्या गावातूनही सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तासाठी मदत पाठविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्तीकालीन बोटी व बचाव पथक यापूर्वीच सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहे.