अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीला मी पराभूत झालो तरी दिलेला शब्द, कामे पूर्ण करणार आहे. ९०० कोटी रुपयांच्या साकळाई योजनेसाठी येत्या पंधरा दिवसांत प्रशासकीय मान्यता मिळेल. ही कामे फक्त आम्हीच करू शकतो. परंतु ज्यांनी लोकसभेला व विधानसभेला शब्द दिला होता, तो सत्यात उतरवला का? दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद फक्त विखे पाटील कुटुंबातच आहे. केवळ आश्वासनावर जगणाऱ्या पारनेर तालुक्याला आता प्रगती व विश्वासाचे राजकारण हवे आहे, असे सांगत माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका केली.
नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील कुकडी कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाची सुरुवात माजी खासदार सुजय विखे व आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी डॉ. विखे बोलत होते. यावेळी विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, अश्विनी थोरात, राहुल शिंदे, विक्रमसिंह कळमकर, गणेश शेळके आदी उपस्थित होते.सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जे काही घडले त्यातून आपल्याला शिकायला हवं. लोकांनी दिलेला निर्णय मान्य करून आम्ही पुढे चालत आहोत.
पारनेरच्या जनतेने कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नये. आम्ही फोटो काढणार नाही, व्हिडिओही काढणार नाही. पण तुम्हाला पाणी देणार. जातेगाव व पळवे गावाचा समावेश उपसा सिंचन योजनेमध्ये केला जाईल. योजनेचे सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होईल.पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी कोणाशी भांडण्याची गरज भासणार नाही. कारण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून कुकडी व पठार भागातील उपसा सिंचन योजना मार्गी लावल्या जातील.