वयोवृद्ध नागरिकाकडून आपल्या पत्नीला लाथाबुक्क्या आणि बादलीने मारहाण करत असल्याचा संतपाजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा प्रकार कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत घडला होता. गजानन बुवा चिकणकर, असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्याने वृद्ध पत्नीला केलेली अमानुष मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान पोलिसांनी गजानन बुवाला बेड्या ठोकल्या आहेत. हिललाईन पोलिसांनी सु मोटोने  गुन्हा दाखल केला आहे.

पाण्याच्या वादातून वृद्धाने आपल्या पत्नीला जाब विचारत बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. महिला वारंवार मला मारु नका, अशी विनंती करत होती. मात्र गजानन बुवा अमानुषपणे मारहाण करत होता. यावेळी घरात इतर महिलाही काम करत होत्या. दरम्यान, कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येत नव्हते, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसते. तर वृद्ध महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली होती.

नातवाने उघड केला आजोबांचा प्रताप; आजीला होणारी मारहाण कॅमेऱ्यात कैद करुन व्हिडीओ केला व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी कुटुंबाला समज दिली होती. मात्र मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. यांमुळे पोलिसांवर देखील दबाव वाढला होता. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि एक पथक आळंदीला रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत.