सावंतवाडी : ​कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून कोकणवासीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली आहे.

पर्यटन, विद्यार्थी आणि स्थानिकांच्या सोयीसाठी मागणी:

खा. शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे आणि तो आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध कोकणी वारशासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या या जिल्ह्यात न थांबता पुढे जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

​या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी निवडक एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्याची विनंती केली आहे. या मागणीमुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांच्या प्रवासात सोय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळेल आणि सामान्य जनतेच्या मागणीला न्याय मिळेल, असे ते म्हणाले आहेत.

​सण-उत्सवाच्या काळात अंमलबजावणीची सूचना:

खा. पवार यांनी या थांब्यांची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर करण्याची सूचना केली आहे. विशेषतः पर्यटन हंगामात आणि गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी यांसारख्या प्रमुख सणांच्या काळात याची अंमलबजावणी केल्यास त्याचा त्वरित फायदा कोकणवासीयांना होईल.

​या निवेदनात खा. शरद पवार यांनी एकूण ३२ एक्स्प्रेस गाड्यांचा उल्लेख केला असून, या यादीतील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर थांबा देण्याची मागणी जोर लावून धरली आहे. कोकणवासीयांच्या हितासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या मागणीकडे रेल्वे मंत्रालय कसे पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.