औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढली आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत ४५८ मतदान केंद्रे होती. त्यात १५१ मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली. आता ही संख्या ६०९ झाली आहे. नव्याने झालेल्या मतदान केंद्रांमुळे मतदान यादी मात्र फोडावी लागणार आहे. ज्या मतदान केंद्रासाठी मतदारांचे नाव पूर्वी अंतिमीकरणात देण्यात आले, ते आता बदलले जाईल. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी नवी कसरत करावी लागणार आहे. मतदारांची सोय व्हावी म्हणून हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (मंगळवारी) अधिसूचना जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख ३ जून आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारही जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण व भाजपकडून शिरीष बोराळकर यांची नावे निश्चित झाली आहेत. मतदारसंघात ३ लाख ६८ हजार ३८५ मतदार आहेत. दि. ३ जूनपर्यंत मतदारांना नव्याने नोंदणी करता येणार आहे. मतदारांची संख्या लक्षात घेता या वेळी मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. या निवडणुकीत मतदान यंत्रे वापरली जाणार नाहीत. मतपत्रिकेवर पसंतीनुसार मतदान करायचे आहे. मतपत्रिका टाकण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात मतपेटय़ा उपलब्ध करून घेण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी दिल्या आहेत.
मतदारयादीचे अंतिमीकरण झाल्यानंतर मतदान केंद्रे वाढली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या यादीप्रमाणे मतदारांना मतदान केंद्र कळणार नाही. काही वेळा ते बदलले जातील, असेही कळविण्यात येते. या निवडणुकीत पोल चिट दिल्या जाणार नाहीत. तथापि, पोल चिट मतदारांपर्यंत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देता येईल का, याची चाचपणी सुरू असल्याचे आयुक्त जैस्वाल यांनी सांगितले. खुल्या गटातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम आहे. या निवडणुकीत नकाराधिकाराचा वापर करता येईल की नाही, या विषयी मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून अजून त्याचे उत्तर आले नाही.
मतमोजणीची प्रक्रिया पसंती क्रमांकानुसार असल्याने ती बराच वेळ चालेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. निवडणूक आयोगाने टेबल वाढविण्याची परवानगी दिल्यास मोजणीची प्रक्रिया वेळेत करता येऊ शकेल का, याची चाचपणी केली जात आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी मतमोजणी केंद्राची पाहणी केली.