जळगाव जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मिळ वनस्पतींनी समृध्द आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने अनेक दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव, सरीसृप, पक्ष्यांची नोंद घेतली असून त्यात ‘निलमणी आमरी’ या दुर्मिळ वनस्पतीची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम घाटातील आर्द्र पानझडी आणि शुष्क पानझडी जंगलामधील प्रदेशनिष्ठ समजली जाणारी निलमणी आमरी ही दुर्मिळ वनस्पती सातपुडय़ात शोधण्यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या राहुल सोनवणे आणि प्रसाद सोनवणे या वनस्पती अभ्यासक जोडीला यश आले आहे. यामुळे ही वनस्पती फक्त पश्चिम घाटातच नव्हे, तर सातपुडय़ात देखील अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचा या वनस्पती विषयीचा शोधनिबंध नुकताच ‘बायोइन्फोलेट’ या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

निलमणी आमरी ही अतिशय छोटेखानी वनस्पती असून ती पुंजक्यात वाढते. ती अत्यंत छोटी असल्यामुळे तिचे अस्तित्व अनेकांच्या लक्षातही येत नाही. ही वनस्पती मुख्यत्वे साग वृक्षावर वाढते. फुलण्याच्या काळात ती पर्णहीन होते. फुले अतिशय छोटी असून मनमोहक असतात. या दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी साग वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी जंगलात शेती करण्यासाठी झालेल्या अतिक्रमणामुळे सातपुडय़ातील सागाचे घनदाट आच्छादन विरळ झाले. परंतु, सहा ते सात वर्षांंपासून अतिक्रमण रोखण्यात वनविभागास बऱ्याच अंशी यश आल्याने सातपुडय़ास गतवैभव प्राप्त होत आहे. सागवान जंगल परत उभे राहत आहे. वनांचे संवर्धन योग्यरित्या झाल्यास निसर्ग देखील पूर्वीची जैवविविधता पुन:स्र्थापित करतो. सातपुडय़ाच्या कुशीत अनेक रहस्य दडलेले आहेत. वन्यजीव संरक्षण संस्था वनविभागाच्या मार्गदर्शनात लोकसहभागातून येथील जैवविविधता संशोधना सोबतच संवर्धनाचे प्रयत्न करत असल्याचे वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे यांनी सांगितले.

या संशोधन कार्यात त्यांना प्रा. डॉ. आर. जी. खोसे (वनस्पती शास्त्रज्ञ, अहमदनगर), प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन आणि अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, संस्था अध्यक्ष रविंद्र फालक, सतीश कांबळे, रवींद्र सोनवणे, वासुदेव वाढे, गौरव शिंदे ,चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence of rare nilmani amri plant in satpuda abn
First published on: 08-07-2020 at 00:18 IST