शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षनावाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्व येथे विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिंदे गटाला दोन तलवार आणि एक ढाल असं चिन्ह देण्यात आलं होतं. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेच मुळ पक्षचिन्ह आणि पक्षनाव शिंदे गटाला देऊ केल्याने एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण परत मिळाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राजापुरात आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियान-मेळाव्यात ते बोलत होते.

“हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. आपआपल्या क्षेत्रातून हे कार्यकर्ते काम करत असतात. हे कार्यकर्ते निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करतील तेव्हा विरोधी पक्षातील उमेदवाराचं डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गेले दीड वर्षे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भागात संपूर्ण राज्यात, अनेक दौरे केले. अनेक भूमिपूजन, लोकार्पण करत असताना अनेक नव-नवीन प्रकल्पांचे शुभारंभ केले. त्यामुळे मला सगळेच लोक सांगत होते की शिवसेना संघटना आणि शिवसेनेकरता वेळ दिला पाहिजे. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून पायाला भिंगरी लावून प्रत्येक कार्यक्रमाला जावं लागत होतं. म्हणून मला आनंद आणि समाधान आहे की या कोकणी माणसाने बाळासाहेबांवर जिवापाड प्रेम केलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर आहे. ज्यांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली याचं समाधान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरीर असलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. शिवसेना, मोठी झाली आणि वाढली. म्हणून शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला आहे. कोकणी माणूस हा फणसासारखा आणि आंब्यासारखा गोड आणि रसाळ असतो. जेव्हा तो संकल्प घेतो, निश्चय करतो तेव्हा तो आरपार लढाई लढतो. या कोकणी माणसाने शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी कोकणी माणसांचं कौतुक केलं.

हेही वाचा >> “माझी या पक्षांना थेट ऑफर आहे, ज्या कुणाला…”, प्रकाश आंबेडकरांचं मविआतील जागावाटपावर सूचक विधान!

“उदय सामंत आणि दिपक केसरकर यांनी मंत्रीपदे सोडली. मी नगरविकास मंत्री होते. आठ-आठ मंत्री माझ्यासोबत होते. धनुष्यबाण आणि शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. विकासाच्या विरोधात भूमिका घेऊ लागले. म्हणून आम्ही हा (शिवसेनेत बंड करण्याचा) निर्णय घेतला. आज आपण अनेक निर्णय घेतले. आज हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. म्हणूनच तुमच्यातील एक माणूस आज तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. बाळासाहेबांनीही त्यांच्या काळात लोकांना मोठं केलं. परंतु, स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी विचार, भूमिका आणि राज्यातील तमाम जनतेच्या भावनांना मुरड घालून जे काही झालं ते अघटित झालं. मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणी माणसाचं बाळासाहेबांशी अतुट नातं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही

“हा प्रभु रामाचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. खोट्याच्या कपाळी गोटा हे खरं आहे, हे कोकणी माणसं येत्या निवडणुकीत खरं करतील. विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे सर्वांना माहित आहे. आम्ही तत्वांशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला, शिवसेनेला काय मिळेल याचा विचार आम्ही केला”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.