पंढरपूर: कार्तिकी वारीला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा द्याव्या. तसेच अतिवृष्टीमुळे शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती तत्काळ करावी अशा सूचना पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेला मुंबई, कोकणासह परराज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.

वारकरी संप्रदयातील महत्त्वाची वारी म्हणजे कार्तिकी. या वारीला प्रामुख्याने मुंबई, कोकण या सह राज्यभरातून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक दरवर्षी न चुकता येतात. या वारीला एक महिना उरला आहे. या वारीला येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि नियोजनासंदर्भात येथील प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रांताधिकारी बोलत होते. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, कार्तिकी वारीचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. वारीला एक महिना उरला आहे. तर २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भाविक मोठ्या संख्येन पंढरीत दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन करावे. वारी कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता व पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा. शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकाची नेमणूक करावी. वाहनतळाची स्वच्छता व पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. अन्न औषध प्रशासन विभागाने खाद्यपदार्थ तसेच प्रसादाच्या दुकानाची वेळोवेळी तपासणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहे.

याचबरोबरीने आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टर, फिरते वैद्यकीय पथक, मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. मंदिर समितीने दर्शनरांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाखरी ते पंढरपूर रस्त्यांची अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करावी. जलसंपदा विभागाने चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी होडी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कार्तिकी यात्रा कालावधीत जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जनावरांना व पशुपालकांना सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील भक्तिसागर (६५ एकर) येथील जागेची स्वच्छता करून वीज, पाणी आदी व्यवस्थेची उपलब्धता करावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या.