सांगली : यापुढे साखर कारखान्यांना केवळ साखर निर्मिती करून चालणार नाही. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले. राजारामनगर येथे साखराळे युनिट, वाटेगाव- सुरुल शाखा, कारंदवाडी युनिट व तिप्पेहळ्ळी (जत) च्या आगामी हंगामासाठी ऊस तोडणी, वाहतूक करार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,जनरल मॅनेजर एस.डी.कोरडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट अमोल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, साखर तयार करण्यास प्रति क्विंटलसाठी ३ हजार ६०० रुपये खर्च येतो व विक्रीचा दर ३ हजार १०० रुपये आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे काळाची गरज आहे. यामुळे इथेनॉल निर्मितीवर या हंगामात लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी तोडणी कंत्राटदार बाजीराव शेवाळे, संभाजी कामेरी कर, श्रीपती चव्हाण, अर्जुन कचरे, पांडुरंग पाटील, आबा यमगर, माणिक पवार, मादाण्णा महिलापुरे, दिलावर पटेल, संदीप डांगे, अशोक वाटेगावकर यांच्यासह कंत्राटदारांशी करार करण्यात आले.