पंढरपूर : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य धारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल आणि संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी स्मृतीसोहळ्या निमित्ताने फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले. श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. संतांचे जीवन प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.