जिल्ह्यातील शिंदखेडय़ाचे माजी आमदार दत्तात्रय ऊर्फ अण्णा वामन पाटील यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे व एक भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी पाटील यांचे पार्थिव धुळे येथील मनमाड जीन भागातील निवासस्थानी आणण्यात आले, तेव्हा अंत्यदर्शनासाठी सर्व स्तरातील नागरिकांची गर्दी झाली होती. स्पष्टवक्तेपणा व दूरदृष्टी असा बाणा अखेपर्यंत जपलेल्या अण्णांचा जन्म धुळे तालुक्यातील नगाव येथे १८ डिसेंबर १९३६ रोजी झाला. अण्णांनी जीवनाच्या उत्तरार्धात जिल्ह्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला. १९५८ ते १९७१ या दरम्यान त्यांनी नगावचे सरपंचपद सांभाळले. वयाच्या १८ व्या वर्षीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. १९६७ ते १९७९ दरम्यान धुळे पंचायत समितीचे सभापतीपद तसेच १९८० ते १९८४ दरम्यान जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून अण्णांनी कामगिरी बजावली. १९८४ ते १९८५ दरम्यान त्यांनी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. १९८५ मध्ये कुसुंबा मतदार संघातून ते निवडून आले. आपली जन्म व कर्मभूमी असलेल्या शिंदखेडा मतदार संघातून १९९० ते १९९५ या दरम्यान ते आमदार राहिले.
अण्णांनी तालुक्यातील बुराई नदीवरील वाडी-शेवाडे प्रकल्प, सुलवाडे प्रकल्पाची संकल्पना मांडली. १९९५च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २००४ मध्येही त्यांनी विजयी पताका फडकविली. १९६९ मध्ये मातोश्री गंगामाई यांच्या नावे नगाव शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली.