केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सोडविण्यास अग्रक्रम देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी वर्धा येथे केली. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे  ‘वर्धा मंथन-ग्रामस्वराज्याची आधारशीला’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडकरी बोलत होते. कुलपती प्रा. रजनीशकुमार शुक्ल अध्यक्षस्थानी होते.

गडकरी यांनी आपल्या भाषणातून प्रामुख्याने ग्रामीण अर्थकारणाचा विचार मांडला. गाव, शेतकरी, कारागीर यांना केंद्रस्थानी ठेवूनच अर्थकारणातील बदल स्वीकारला पाहिजे. गांधी, विनोबा, राममनोहर लोहिया, दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारात गरिबांच्या उन्नतीचे समान सूत्र आहे. या सूत्राधारेच तंत्रज्ञानावर आधारित बदल घडविण्याचा मानस आहे. खादीत ती ताकद आहे. ग्रामीण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी विपनन व्यवस्था बदलली पाहिजे. धानाचे व कापसाचे कुटार ऊर्जानिर्मितीचा मोठा स्रोत ठरू शकते. त्याद्वारे इथेनॉल, बायोगॅसनिर्मितीस प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत बदल होईल. त्यादृष्टीने पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करण्याचा निर्धार केला  आहे.

शेतकऱ्यांचा भाजीपाला प्रक्रिया उद्योगातून विदेशात जाऊ शकतो. चांगले पॅकेजिंग, ब्रॅडिंग केल्यास येथील सुप्रसिद्ध गोरसपाक हे उत्पादन जागतिक बाजारात लोकप्रिय ठरू शकते, असेही गडकरी म्हणाले.  या वेळी विनोबाजींचे सचिव बालविजय, महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश शर्मा, खा. रामदास तडस यांचीही भाषणे झाली. कार्यशाळेतील प्रथम सत्रात पोपटराव पवार, देवाजी तोफा, मोहन हिराबाई, रवी गावंडे, दिलीप केळकर यांनी विचार व्यक्त केले.

शेतकऱ्यांशिवाय देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही

सध्या देशभरात शेतकरी आंदोलनावरून रान पेटले आहे. या पार्श्वभूमीवर गडकरींनीही शेती आणि शेतकरी यांचे महत्त्व विशद केले.  ग्रामीण अर्थकारणात बदल घडविण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकरी, शेतमजूर आत्मनिर्भर झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन गडकरी यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer suicides union minister nitin gadkari announcement akp
First published on: 07-02-2021 at 03:13 IST