Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आले आहेत. शिवसेनेप्रमाणेच अजित पवारांनीही राष्ट्रवादीवर दावा केला असून हे प्रकरण आता निवडणू आयोगाच्या दरबारी पोहोचले आहे. दरम्यान, काल (५ जुलै) झालेल्या बैठकीत मी माझं घर पुन्हा बांधेन असा चंग शरद पवारांनी बांधला. राष्ट्रवादीतील बरेच आमदार, नेते, पदाधिकारी अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांच्या गटाकडे ताकद कमी उरली आहे. परंतु, असे असतानाही मी पुन्हा नव्याने उभा राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. आज त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
“हे पहिल्यांदा राज्यात घडत आहे. राज्याचा साठ वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर सरकार कोणाचंही येवो आम्ल मात्र बारामतीचाच चालत होता. बारामतीचा हा अंमल देवेंद्र फडणवीसांनी रोखला. बारामतीहून सुटलेला हा अश्वमेध फडणवीसांनी रोखला. त्याचा परिणाम लक्षात आला असेल. जगाचे सरदारसुद्धा सैरवैर झालेले पाहिले. त्यांचे सेनापती दाही दिशा पळायला लागले आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या पाया पडायला निघालेले आहेत”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
हेही वाचा >> “वसंतदादा तुम्ही आज असायला पाहिजे होता, देवेंद्रजींनी…”, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
पवारांनी अनेकांची घरे उद्ध्वस्त केली
“ज्या चव्हाणांनी गाववाड्यावरून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा पाया रचला तो पाया उद्ध्वस्त करायचं काम पवारांनी केलं. तेच पवार साहेब म्हणत आहेत की माझं उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा नव्याने तयार करेन. पण तुम्ही अनेकांची घरे उद्ध्वस्त केलीत. त्यावेळी तुम्हाला कधी अंतकराणाने डोकावून पाहावं वाटलं नाही”, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
गोरगरिबांच्या माड्या उद्ध्वस्त केल्या, आता तुमची माडी पडली
“या राज्यातील शेतकरी तुमच्या धोरणांमुळे आत्महत्या करू लागला. राज्यातील सर्व सहकार चळवळ मोडीत काढली. तुमच्या सर्व चेल्या चपाट्यांनी सहकार चळवळीची राखरांगोळी केली. त्यावेळी पवारांना गावगाड्यातील शेतकरी दिसला नाही. गावगाड्यातील शेतकऱ्याचं घर पडतं, उद्ध्वस्त होतंय हे दिसलं नाही. गावगाड्यातील घरं, गोरगरिबांच्या माड्या उद्ध्वस्त केल्यात. आता तुमची माडी पडली. मग गावगाड्याला वाईट का वाटेल?
हेही वाचा >> एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात? उदय सामंत म्हणाले, “१२ महिन्यांपूर्वी जो उठाव झाला…”
शेतकरीविरोधक शरद पवारांना रोखायचं
“पण सरदार दाही दिशाला सैरवैर झाल्यावर सेनापती गावगाड्याकडे निघालाय, मला वाचवा मला वाचवा करत. पुण्यात काका मला वाचवा आहे. आता पुतणेसाहेब मला वाचवा सुरू आहे. म्हणजे उलट्या दिशेने गंगा वाहायला लागली. आता मजा येतेय. कारण तुम्ही साठ वर्षे राज्य केलं. याच जन्मामध्ये जे पेरलेत याच जन्मात फेडायचं आहे. दुसऱ्या जन्मात नाही. पूर्वी लोक म्हणायचे की बा ने केलेलं पोराने फेडायचं. आता कलियुगात बा ने केलेलं बानेच फेडायचं. याची डोळा याची देही. गावगाड्यातील माणसं प्रचंड खुशीत आहेत. आमच्यासारख्यांनाही चार पाच दिवसांपासून मजा वाटायला लागलीय. परत काय बांधणार? राख झाली. आमचं एकच काम आहे. शरद पवार नावाच्या शेतकरीविरोधक व्यक्तीला रोखणं हे आमचं काम आहे. आता या माणसाला गावाकडे घ्यायचं नाही”, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी केला.
शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण सुरू केलं
“या राज्यात पवारांनी सतत जातीपातीचं राजकारण केलं. पवार आता कामाला लागतील. प्रत्येक समाजाचा मोर्चा निघायला लागेल. फडणवीसांच्या काळातच या मोर्चांचे पेव फुटले. काही प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटतात. पण चर्चा न करता सरकार अस्थिर करण्याचं काम यांनीच केलंय. गावगाडा ज्यांनी लुटला आज त्यांनी कबुल केलं की मी माझं घर नव्याने बांधीन म्हणजे तुमचं घर पडलं हे पवारांनी मान्य केलं. आतापर्यंत आमचं घर पडत होतं आता तुमचं पडलं”, असंही खोत म्हणाले.