​सावंतवाडी: भात आणि बागायती शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी सध्या सुरू आहे. मात्र, या ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा चुकीच्या सर्व्हे नंबरची नोंदणी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेली ही नोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

​या ॲपमधील समस्यांमुळे शेतकरी आणि बागायतदार यांनी २०२५-२६ चा पीक विमा भरलेला असूनही, जर ‘ई-पीक’ नोंदणी झाली नाही, तर त्यांना पीक नुकसानीच्या भरपाईपासून तसेच शासकीय हमी भावाने भात विक्रीपासून वंचित राहावे लागेल. यामुळे शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासूनही दूर राहत आहेत.

​अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी यावर निश्चित बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.

​या संदर्भात भारतीय किसान संघ, महाराष्ट्रच्या ग्राम समिती, कोलगाव यांच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, नव्याने अद्ययावत झालेल्या ‘ई-पीक पाहणी’ ॲपमधील विविध त्रुटींवर भर देण्यात आला आहे. यात, प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदणी केली असता पिकाचे स्थान किंवा सर्व्हे नंबर योग्य जागी न दाखवता दुसऱ्याच ठिकाणी दाखवला जात असल्याचा मुख्य मुद्दा मांडण्यात आला. तसेच, काही ठिकाणी जुने सर्व्हे नंबरही दाखवले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या निवेदनाद्वारे, किसान संघाचे कोलगाव ग्राम संघाचे अध्यक्ष मुकेश मोहन ठाकूर यांनी या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून ‘ई-पीक पाहणी’ नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

​यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार, ग्राम समिती अध्यक्ष मुकेश ठाकूर, सदस्य रुपेश परब, अभिजीत सावंत, चंद्रकांत सावंत, विद्धेश धुरी, पुरुषोत्तम कासार, महेश टीळवे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

​या निवेदनाची दखल घेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या समस्येची सखोल माहिती घेऊन लवकरच यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन भारतीय किसान संघाच्या सदस्यांना दिले आहे.