मतभेद आणि वादावर पडदा टाकण्यासाठी आता राजू शेट्टींनी सुकाणू समितीतून बाहेर पडण्याची दर्शवली आहे. सुकाणू समितीची नाशिकमध्ये जी बैठक झाली त्याचा सूर पाहता शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व मी करावे अशी सगळ्यांची भूमिका होती. सगळ्यांना सोबत घेऊन घेऊन जाण्यासाठी मी तयारीही केली. मात्र काही लोकांना अजूनही आक्षेप असे दिसते आहे, त्यामुळे मी सुकाणू समितीतून बाहेर पडायला तयार आहे अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. एबीपी माझाशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही भूमिका मांडली आहे.

तसेच मला सरकारशी काहीही देणेघेणे नाहीये.. माझे सरकारविरोधातले आंदोलन सुरूच ठेवणार आहे असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. सरकारला आम्ही दोन दिवसांची मुदत दिली होती, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल असे सुकाणू समितीने म्हटले होते. सरकारकडून चर्चेचे निमंत्रण आल्याचे मला माहिती नाही. रविवारी सरकारसोबत बैठक आहे. त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू.. मात्र त्याआधी सुकाणू समितीच्या काही लोकांनी घाई गडबडीत भूमिका मांडणे चुकीचे आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे सूत्रे आणि अजित नवलेंकडे समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. जर आमच्यावर विश्वास नसेल तर अजूनही मी माझे नाव मागे घ्यायला तयार आहे असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

बैठकीत सगळ्यांची मते काय आहेत ते मी जाणून घेईन आणि त्यानंतर समन्वयाच्या मतभेदांवर मत मांडेन असेही शेट्टी यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सुकाणू समितीत राजकीय थिल्लरपणा सुरू आहे असा आरोप शेती अर्थतज्ज्ञ गिरीधर पाटील यांनी केला होता. त्यानंतर या सुकाणू समितीत फूट पडल्याची चर्चा चांगलीच रंगली. त्यावर आता राजू शेट्टी यांनी थेट उत्तर देत वेळ पडल्यास बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.