सोलापूर : एमआयएम पक्षाची सोलापुरातील धुरा मागील दहा वर्षांपासून सांभाळणारे फारुख शाब्दी यांच्यावर आता सोलापूरबरोबरच चक्क मुंबईचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. फारूख शाब्दी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील राहणारे आहेत. त्यांचे मुंबईतही उद्योग-व्यवसाय आहेत. विशेषतः मनीष मार्केट परिसरात त्यांचे वडील मकबूल शाब्दी यांचा व्यापार चालत आला आहे. फारूख शाब्दी हे सुरुवातीला मनसे पक्षात कार्यरत होते.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत ते अक्कलकोट मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यानंतर त्यांनी थेट एमआयएम पक्षात प्रवेश करून सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक २०१९ आणि २०२४ याप्रमाणे सलग दोनवेळा लढवून काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज देत द्वितीय क्रमांकाची मते मिळविली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असिदोद्दीन ओवैसी यांनी शाब्दी यांचे सोलापूरचे अध्यक्षपद कायम ठेवत त्याबरोबरच मुंबई प्रांताच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू, अशी ग्वाही देत फारूख शाब्दी यांनी आपले मुंबईत अनेक घटकांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्या आधारे आपण पक्ष संघटनेचा विस्तार करू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला आहे.