नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रस्तावित नोकरभरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी निवडण्यात आलेल्या महागड्या संस्थेमुळे बँकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. ‘आय.बी.पी.एस.’सारख्या नामांकित संस्थेच्या दराची किमान चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न चौकशी अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा बँकेतील कर्मचारी भरतीप्रक्रिया आणि त्रयस्थ संस्था निवडताना झालेली गडबड, तसेच या प्रकरणातील बँकेच्या काही संचालकांनी केलेली वाटणी, त्यांची हिस्सेदारी आदी बाबी मागील आठवडाभरात येथे गाजल्यानंतर विभागीय सहनिबंधकांच्या तातडीच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी गुरुवारी बँक प्रशासनाकडून सर्व कागदपत्रे मागवून घेत काही अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली.

विश्वास देशमुख यांनी बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांवर एकप्रकारे ‘अविश्वास’ दर्शविला आहे. तीन इच्छुक संस्थांपैकी बँकेने ज्या संस्थेची (वर्कवेल इन्फोटेक, पुणे) ऑनलाइन परीक्षा घेण्यास्तव निवड केली, त्यामुळे बँकेला अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र उमेदवाराची परीक्षा घेण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे, असे निदान करून देशमुख यांनी यात बँकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे नमूद केले. ‘आयबीपीएस’सारखी बँकिंग परीक्षा घेण्याचा मोठा अनुभव असलेली संस्थाही उपलब्ध होती. या संस्थेने बँकेच्या निविदाप्रक्रियेत भाग घेण्यास नकार दिला होता. पण ही संस्था काम करण्यास तयार होती, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिपरीक्षार्थी दर जाणून का घेतला गेला नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला असल्याचे सांगण्यात आले.

बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय योग्य की, अयोग्य यावर चौकशी अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही; पण वरील निर्णय बँकेसाठी आर्थिकदृष्ट्या हानिकारक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. त्यांच्या अहवालानंतर विभागीय सहनिबंधक शासनाकडे काय शिफारस करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एकंदर स्थिती पाहता या प्रकरणात बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शकता, विश्वासार्हता घालवली असल्यामुळे नोकरभरती प्रक्रिया थांबविली जाण्याची शक्यता आहे.