बीडमध्ये वक्फ मंडळाने ५१ वर्षांचा करार करून भाडेतत्वावर दिलेली सय्यद सुलेमान साहेब दर्ग्याची जमीन बनावट कागदपत्रांच्याआधारे स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिवारी एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांच्यासह त्यांचे वडील शेख जैनोद्दीन यांच्याविरुध्द बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ जमीन प्रकरणी दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे. जिल्हा वक्फ अधिकारी अमिनुज्जमा सय्यद यांच्या तक्रारीवरुन या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील सर्व्हे क्रमांक २० मधील सय्यद सुलेमान साहेब दर्ग्याशी संबंधित असलेल्या या सेवाबहाल जमीनीबाबत मराठवाडा वक्फ महामंडळाने २८ ऑक्टोंबर १९९३ मध्ये ठराव केला होता. ही जमीन हाजी शेख सुजाऊद्दीन दादामियाँ, शेख जैनोद्दीन शेख सुजाऊद्दीन व मिर्झा शफिक बेग मिर्झा उस्मान बेग (सर्व रा. सुभाष रस्ता, बीड) यांना १४ सप्टेंबर १९९४ मध्ये ५१ वर्षांसाठी दरवर्षी ५ हजार रुपये भाडे करारावर दिली होती. त्यावेळी २० रुपयांच्या मुद्रांकावर ३८ हजार चौरस फूट जमीन भाडेतत्वावर देऊन त्यांच्याकडून देणगी म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती.

शेख सुजाऊद्दीन यांचे निधन झाल्यानंतर शेख जैनोद्दीन व त्यांचा मुलगा शेख निजाम यांनी संगनमत करुन ३० जून २००२ मध्ये सदरील १ एकर ८ गुंठे जमीन बेकायदेशीररित्या स्वतःच्या मालकीची करुन घेतली. जमीन भाडेतत्वावर दिलेली असताना शेख निजाम, त्यांचे वडील शेख जैनोद्दीन यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाचा, स्वाक्षरीचा बनावट आदेश तयार केल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जिल्ह्यात आष्टी तालुक्यात ३ आणि बीडमध्ये २ असे एकूण ५ गुन्हे वक्फ जमिनीच्या प्रकरणात दाखल झाले आहेत. ५ गुन्ह्यातील आरोपींची संख्या ३५ हून अधिक आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे.