ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या हवालाने ‘एएनआय’ने पुढे सांगितलं की, लोअर परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुलाचे काम अद्याप बाकी असताना १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतर काही नेत्यांनी या पुलाचे उद्घाटन केलं आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.