भाजपाच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याचे पडसाद यवतमाळातही उमटले. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नुपूर शर्मासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लीम समुदायाच्या वतीने मोहम्मद एहतेशाम मोहम्मद शकील यांनी १० जून रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नुपूर शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी मुस्लीम समुदायातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असं वक्तव्य केलं होतं. यातून देशाच्या राष्ट्रीय एकात्मता व सुरक्षेला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

भाजपा दिल्लीचे माध्यम प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनीदेखील ‘ट्वीटर’वर नुपूर शर्माच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. संबंधित वृत्तवाहिनीनेदेखील स्वत:ची ‘टीआरपी’ वाढवण्याकरिता हा कार्यक्रम प्रसारित केला. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोह, सामाजिक व धार्मिक सद्भावना बिघडवणे आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. याप्रकरणी मोहम्मद एहतेशाम मोहम्मद शकील यांच्या फिर्यादीवरून यवतमाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.