धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ कारखान्याजवळ असलेल्या बंगल्यासमोर गुरूवारी मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी अज्ञातांच्या अटकेसाठी सावंत समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

परंडा येथे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदर गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन हल्लेखोर मोटारसायकलवर आले व त्यांनी बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच सावंतांच्या बंगल्यावरील नोकर-चोकरांनी घाबरून त्यांना पकडण्यासाठी बाहेर येईपर्यंत दोघेजण मोटारसायकलवरून पसार झाले. दरम्यान या घटनेची माहिती समजल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक संजय जाधव व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली व हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना केले.

आणखी वाचा-Pankaja Munde: “राहुल गांधींबाबत मनोज जरांगे पाटील…”, पंकजा मुंडेंचं टीकास्र; ‘या’ विधानावरून केलं लक्ष्य!

दरम्यान धनंजय सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला करू पाहणार्‍या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी सावंत समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करून मागणीचे निवेदन पोलीस प्रशासन तहसील प्रशासनाला देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, गौतम लटके, जयदेव गोफणे, समीर पठाण, दत्ता रणभोर यांच्यासह अनेक शिवसेना सावंत समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंडा मतदारसंघात राजकीय वातावरण दूषित

मराठवाड्यात परंडा तालुका शांतताप्रिय, अशी ओळख असलेल्या या तालुक्यात आजपर्यंत दिवंगत माजी आमदार नानासाहेब देशमुख, चंदनसिंह सद्दीवाल, महारुद्र मोटे यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत परंडा विधानसभा मतदारसंघात केवळ निवडणूक काळात एकमेकांना विरोध असल्याचे जनतेने पाहिले आहे. नंतर मात्र हे नेते विरोध करीत नव्हते. या मतदारसंघातील जनतेने आजपर्यंत राजकीय वादावादी, एकमेकांची उणेदुणे पाहिले नाही. गुरूवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर मात्र मतदारसंघात राजकीय वातावरण वेगळ्या वळणाला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शिस्तप्रिय असलेल्या या मतदारसंघाला गालबोट लागत असल्याने या जनतेतून नाराजीचा सूर निघत आहे.