जेजुरी, प्रतिनिधी 
आजपर्यत पुरंदर तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नव्हता परंतु आता खंडेरायाच्या जेजुरीत एका तरुणाला करोनाची लागण झाली आहे.पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी आज जेजुरी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुनम शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खंडोबा देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रुग्णाच्या संपर्कातील २४ जणांना जेजुरीत तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.तर २१ जणांना घरातच होम कॉरंटाइन करण्यात आले.

करोनाची लागण झालेल्या रुग्णाला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कोविड सेंटरमधील २४ जणांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळतात प्रशासन खडबडून जागे झाले.शनिवारी सकाळी डायलेसिस सेंटर असलेली भक्त निवासाची इमारत व तो रुग्ण रहात असलेला परिसर निर्जंतुक करण्यात आला.आजपासून तीन दिवस संपुर्ण जेजुरी शहर कॉन्टेंमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून तर जेजुरी परिसरातील गावे व औद्योगिक वसाहत बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.तीन दिवस जेजुरी शहर पूर्णपणे बंद करण्यात आले असून मेडिकल दुकान व दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जेजुरी येथे शिक्षकांच्या मदतीने घरोघर जावून सर्वे करण्यात येणार आहे.

करोना प्रतिबंधित भाग:- जेजुरी शहर , जेजुरी ग्रामीण , जेजुरी रेल्वे स्टेशन , खोमणे मळा , ज्ञानोबा नगर , कडेपठार परिसर

बफर झोन :- धालेवाडी, कोथळे, बेलसर, साकुर्डे, जगताप मळा, कोळविहीरे, रानमळा, मल्हारसागर परिसर, मावडी-मोरगाव रोड, खैरेवाडी, जेजुरी एमाआयडीसी, नाझरे सुपे , नाझरे क.प,वाळुंज , निळुंज परिसर

एमाआयडीसी सुरु राहणार
जेजुरीत जरी करोनाचा रुग्ण आढळला तरी या रुग्णाचा एमाआयडीसीशी कोणताही संपर्क आलेला नाही.त्याचप्रमाणे अनेक दिवस कारखाने बंद राहिल्याने कामगारांचे हाल झाले आहेत.फक्त तालुक्यातील कामगारांना घेऊन कारखाने सुरु केले आहेत.पुण्याहून कोणीही येथे रोज ये-जा करत नाही.तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असे तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First case of corona positive in jejuri pune scj
First published on: 09-05-2020 at 20:03 IST