अलिबाग : राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्लू फ्लॅग मानांकन’ प्रमाणपत्र मिळवले आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव सह, पालघरमधील पर्णका बीच, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाले आहे.
जागतिक पातळीवर स्वच्छ, सुंदर समुद्र आणि पर्यावरण पुरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिले जाते. डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थे मार्फत हे मानांकन दिले जाते. ३३ निकषांचे मूल्यमापन करून ब्ल्यू फ्लॅग दर्जा दिला जात असतो. पर्यावरण शिक्षण, जल गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसेच सेवा सुरक्षा, सेवा या घटकांचा यात समावेश असतो.
या घटकांच्या पडताळणीनंतर समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र दिले जात असते. कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांनी या मानांकनासाठी अर्ज केले होते. ज्याची पडताळणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली होती. या पडताळणी नंतर राज्यातील पाच किनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आले आहेत. या पुर्वी देशातील १३ समुद्र किनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आले होते. मात्र त्यात राज्यातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नव्हता.
या मानांकनामुळे महाराष्ट्रातील किनारे जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकतील, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र सरकार वन विभाग आणि नागाव ग्रामपंचायत यांच्यात एक सामंजस्य करार झाला होता. जैवविवीधता संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षितता, आणि पर्य़टन सोयीसुविधा यावर भर देण्यात आला होता. नागाव ग्रामपंचायतीने हे मानांकन प्राप्त व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनीही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
तर श्रीवर्धनचा समुद्र किनारा नगर परिषदेने विकसित केला आहे. निसर्ग चक्रीवादळात या समुद्र किनाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. मात्र राज्यसरकारकडून निधी आणून आदिती तटकरे यांनी या समुद्र किनाऱ्याचे नव्याने सुशोभिकरण करून घेतले होते. समुद्र किनाऱ्या शाश्वत आणि पर्यावरण पूरक विकासासाठी प्रयत्न करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्रकिनारे हे गेल्या काही वर्षात पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. ब्लू फ्लॅग प्राप्त झाल्याने हे दोन्ही समुद्रकिनारे जागतिक पातळीवर आदर्श समुद्रकिनारे म्हणून समोर येणार आहेत.