अलिबाग : केंद्र सरकारच्या सागरमाला योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात जलमार्ग विकासाची पाच कामे हाती घेण्यात आली होती. मात्र ठेकेदारांची निष्क्रीयता आणि इतर कारणांमुळे ही सर्व कामे रखडली आहेत. त्यामुळे जलमार्ग विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ बसली आहे. सागरमाला योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात काशिद, रेवदंडा, करंजा, रेवस, आणि मोरा येथे जलमार्ग विकास प्रकल्पा अंतर्गत जेटी विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अलिबाग, मुरूड आणि उरण तालुके जलमार्गांनी जोडणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र विवीध कारणामुळे ही सर्व कामे रखडली आहे. काशिद येथे ११२ कोटी रुपये खर्चून प्रवासी जेटी उभारली जाणार आहे. जवळपास ९९ कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे. ब्रेक वॉटर बंधाराचे काम पूर्ण झाले असले तरी जेटीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जेटीच्या संरचनेत बदल केल्याने या कामाला उशीर झाला.

उरण तालुक्यातील करंजा येथे ९ कोटी ६८ लाख रुपये खर्चून रो रो जेटी उभारण्यात येणार आहे. ५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्चही झाला आहे. मात्र स्थानिकांकडून जोड रस्त्याच्या कामात विरोध झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. रेवस येथील रो रो जेट्टीची परिस्थिती फारशी वेगळी नाही. या जेट्टीसाठी २५ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. ज्यापैकी १३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र ठेकेदारच्या अकार्यक्षमतेमुळे उर्वरित काम रखडले. आता ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली असून सुधारित मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रेवस येथील जेट्टीचे काम सध्या बंद आहे. उरण तालक्यातील मोरा येथे ८८ कोटी रुपये खर्चून रो रो जेटी उभारण्यात येणार आहे. यातील २० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र या जेटीचे कामही संथगतीने सुरू आहे. मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर १११ कोटी रुपयांची जेट्टी उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. ८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र मार्च अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र उर्वरीत कामांना आणखिन काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रेवस आणि करंजा दरम्यान पूलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. पण हे काम पूर्ण होण्यास काही वर्षांचा कालावधी जाईल. त्यापुर्वी जर या मार्गावर रोरो सेवा कार्यान्वित झाली. तर अलिबाग ते उरण या तालुक्यांतील प्रवासाचा वेळ निम्यावर येणार आहे. मुंबईत जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी हा प्रकल्प उपयुक्त असणार आहे. त्यामुळे जेटीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी पाठपुरावा केला जाईल महेंद्र दळवी, आमदार निरनिराळ्या कारणांनी सागरमाला योजनेतील कामांना उशीर झाला असला तरी या वर्ष अखेर जेट्यांची कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. रेवस जेट्टीच्या ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली असून, तिथे नवीन ठेकेदार नेमून उर्वरीत कामे पूर्ण करून घेतली जातील. सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड.