दुष्काळ, पूर आणि अवकाळी पावसामुळे उसाला फटका, साखर उद्योग धोक्यात

सुरुवातीस दुष्काळ, मग महापूराने हैराण केलेल्या पश्चिम महाराष्ट्राला आता लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून खरिपाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटणार आहे. याशिवाय या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या उस पिकालाही याचा फटका बसला असून, यामुळे साखर उद्योगही धोक्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या महापुरापाठोपाठ लांबलेल्या पावसाने आता शेतीबरोबरच ग्रामीण अर्थकारणच धोक्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्य़ांतील काही दुष्काळी भाग सोडला तर हा भाग शेतीसाठी सुपीक मानला जातो. परंतु गेली दोन वर्षे या भागावर अवर्षणाचे सावट पसरलेले आहे. यातच या वर्षी या अतिवृष्टीची भर पडल्याने दुष्काळापाठी आलेल्या ओल्या दुष्काळाने इथली शेती आणि शेतकरी संपूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे.

सांगलीत पिके पाण्याखाली

प. महाराष्ट्रात अवकाळीचा सर्वाधिक फटका हा सांगली जिल्ह्य़ाला बसला आहे. जिल्ह्य़ातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक या आपत्तीने नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे जिल्ह्य़ाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. रोजगार निर्मितीबरोबरच व्यापारउदिमही यंदा अवकाळीने नुकसानीच्या कवेत घेतला असल्याने याचे दीर्घकालीन परिणाम बाजारपेठेवर होण्याची चिन्हे आहेत. सुगीचा हंगाम सुरू असतानाच आलेल्या या अतिवृष्टीने जिल्ह्य़ाच्या सर्वच भागांत दाणादाण उडली. सोयाबीन, मका, भात, संकरित ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद, कापूस ही पिके पाण्याखाली गेली. तयार पीक काढणीच्या वेळीच पाऊस झाल्याने उत्पन्न पाण्यात गेले, तर ज्वारी, बाजरी, मका या पिकांना धाटावरच मोड आले. भुईमुगाच्या शेंगांनाही जमिनीतच कोंब आले आहेत. जिल्ह्य़ात यंदा महापुराने उसाचे पीक गेले, यातून वाचलेले पीक अवकाळीच्या पावसाने हिरावून नेले. उसाला जमिनीत नवे कोंब फुटल्याने वजनात आणि साखर उताऱ्यात घट तर येणार आहेच, पण यंदा तोड आली तर चिखलामुळे वाटाही नाहीत अशी गत झाली आहे. नगदी पीक असलेली डाळिंब आणि द्राक्ष शेतीही अभूतपूर्व हवामानाचा सामना करता करता मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे.

कोल्हापूरवर नवे संकट

महापुराने जिल्ह्य़ातील बहुतांश शेती भुईसपाट झालेली असताना आता त्यातून बचावलेले पीक अवकाळीच्या दणक्याने मृत झाले आहे. ऊ स, भुईमूग, भात, भाजीपाला, सोयाबीन, नागली, ज्वारी अशी पिके हातातून निघून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्य़ातील सुमारे वीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाची सुरुवात उत्तम झाली. नंतर महापुराचा रुद्रावतार प्रकटला. महापुराने नदीकाठावरील पिके कुजून गेली. कष्टाने पिकविलेली पिके दसरा-दिवाळीच्या सुमारास काढणीस आली असताना अवकाळीने भंडावून सोडले आहे. पिके कुजल्याने वैरणीचा प्रश्नही भेडसावणार आहे. कोल्हापूर हा उसाचा जिल्हा समजला जातो. परंतु यंदा उसाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची आणि त्यातून साखर धंदाच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. ऊस उत्पादन घटले, असलेला ऊस तोडता येत नाही, बंद कारखाने-गुऱ्हाळघरे या साऱ्यांमुळे अर्थव्यवस्थाच अडचणीत येणार आहे.

सोलापुरात ओला दुष्काळ

सलग दोन वर्षे दुष्काळाचे संकट भोगलेल्या सोलापुरावर यंदा ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सोलापूर जिल्हा रब्बी हंगामासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात थोडय़ाशा पावसाच्या आधारे सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. परंतु नंतर पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका वाढला. त्यातूनही काही उरलीसुरली पिके वाचली आणि बहरू लागली. तेव्हा अतिरिक्त पावसाचा फटका बसला आणि हातची पिके उद्ध्वस्त झाली. जिल्ह्य़ात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांचेही नुकसान झाले.

पुण्यात खरिपाचे नुकसान

यंदाच्या हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्य़ात झाली. वादळ-वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्य़ातील बहुतांश तालुक्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम धोक्यात आला असून आतापर्यंत २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ाचे खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार हेक्टर इतके आहे. पावसामुळे ४० हजार ७४५ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, बाजरी, खरीप, ज्वारीसह मका आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. द्राक्ष मणी आणि डाळिंब फळांचीही गळ झाली आहे. भाताचे पीक भुईसपाट झाले आहे. कांद्याची मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

साताऱ्यात पिके कुजली  : अतिवृष्टी, अवकाळीच्या तडाख्याने सातारा जिल्ह्य़ातील खरिपाची हातातोंडाशी आलेली पिके कुजली आहेत. प्राथमिक माहितीत जिल्ह्य़ातील पेरणी झालेले जवळपास दोन तृतीयांश क्षेत्र अतिपावसाने पूर्णत: बाधित झाले असून, कोटय़वधींच्या हानीमुळे शेतकरी हवालदिल आहे. कृष्णा-कोयना नद्यांकाठच्या शेतीची दोन महिन्यांपूर्वीच्या महापुराने वाताहत केली. याची भरपाई मिळणे बाकी असताना आता, जिल्ह्य़ातील जवळपास चौदाशे गावांना या अति आणि अवकाळी पावसाने झोडले आहे. तब्बल १७ हजार हेक्टरवरील काढणीला आलेले पीक हातचे गेले आहे. दीडपट ते चौपट अशा झालेल्या पावसाने सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, भात, आले, हळद, सीताफळ, आंबा तसेच सर्व प्रकारचा भाजीपाला, फळांची वाताहत झाली.

नगरमध्येही फटका : ऐन पावसाळय़ात आलेल्या पूरस्थितीपाठी आता होत असलेल्या अतिवृष्टीने नगर जिल्ह्य़ातील कृषी क्षेत्र ओल्या दुष्काळाकडे सरकू लागले आहे. सुरुवातीला गोदावरी, प्रवरा, मुळा आणि भीमा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या वेळी आचारसंहितेमुळे हे पंचनामे रखडलेले असतानाच अवकाळीने उर्वरित पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्य़ातील सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा, तसेच द्राक्ष, डाळिंब व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. बागेत सर्वत्र साठलेले पाणी आणि रोगराई यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत.

(लेखन :  दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, एजाजहुसेन मुजावर, प्रथमेश गोडबोले, अशोक तुपे, विजय पाटील.)