पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र सीना नदीत येणारे पाणी कमी असल्याने तूर्तास धोका टळला आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी विविध देवस्थाने तसेच मदतीचे हात पुढे आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला. मात्र रविवारी पावसाने काही ठिकाणी उघडीप घेतली. सीना नदीकाठच्या गावांत पाणी ओसरत आहे. मात्र अहिल्यानगर आणि धाराशिव येथे अजून दोन दिवस पावसाचा अंदाज आहे आणि त्या दोन जिल्ह्यांत पाऊस पडत आहे. त्यामुळे सीना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र येणारा विसर्ग पाहता पुन्हा पूरस्थिती निर्माण होईल अशी शक्यता नाही. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सतर्क आहे. नागरिकांना निवारा केंद्रात राहण्या-खाण्याची, आरोग्याची सुविधा दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या, नागरिकांशी संवाद साधला. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील पूरग्रस्तांच्या घरी जाऊन महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीला अनेकांचे हात पुढे आले आहेत. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर समिती, शेगावचे संत गजानन महाराज संस्था अशा अनेक देवस्थानांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत जाहीर केली आहे. दरम्यान, काही पूरग्रस्त गावांतील पाणी ओसरले आहे. त्या गावांत स्वच्छता, रोगाराई होऊ नये म्हणून फवारणी, पिण्याचे टँकर आदी सुविधा देत गावात स्वच्छता सुरू केली आहे. असे असले तरी पुढील दोन दिवस लगतच्या जिल्ह्याला अलर्ट दिल्याने नागरिक धास्तावले आहेत तर प्रशासन सतर्क आहे.
पंढरपुरात पावसाची जोरदार हजेरी
पंढरपूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्रीपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी रस्त्यावर आले. तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. लाखो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून भीमा अर्थात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे.