नंदुरबार: जिल्ह्यातील वडफळी शासकीय आश्रमशाळेत रविवारी पुराचे पाणी शिरले. गावकरी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धोका ओळखून विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप हलवले. पुराच्या पाण्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि रोज वापराचे साहित्य वाहून गेले.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात देवनदी किनारी वडफळी शासकीय आश्रमशाळा आहे. शनिवारी रात्रीपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने देवनदीला पूर आला. पुराचे पाणी रविवारी सकाळी ८ च्या सुमारास आश्रमशाळेत शिरले. आश्रमशाळा अधीक्षकांनी शाळेतील वरिष्ठ विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या मदतीने लहान विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हलविले. जवळपास ३५ वरिष्ठ विद्यार्थी आश्रमशाळा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले. शेवटी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना दोरी बांधून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. शाळेत जवळपास २०१ विद्यार्थी आहेत. पुरात शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांच्या रोज वापराच्या वस्तूंच्या पेटय़ा वाहून गेल्या. या विद्यार्थ्यांना प्रशासन, आदिवासी विकास विभाग आणि सरकारकडून तत्काळ मदतीची अपेक्षा आहे. दुपारी १ नंतर पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर आश्रमशाळेतील पाणीदेखील ओसरले.