अहिल्यानगर:जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपून काढले. काल, रविवारी २१ तर आज, सोमवारी १९ मंडलात अतिवृष्टी झाली. नगर, पाथर्डी, शेवगाव व श्रीगोंदा तालुक्यात पुरामुळे काही गावांचे संपर्क तुटले आहेत. करंजी (ता. पाथर्डी) येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ जणांची बचाव पथकाने सुटका केली.
दरम्यान हवामान विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात सावधानतेचा इशारा दिल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांना बहाल केले आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक शाळांबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा, असे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान नगर शहरातील काही शाळा भरल्यानंतर आज सकाळी सोडून देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने नगर जिल्ह्याला पुन्हा उद्या, मंगळवार व परवा, बुधवार असे दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने नगर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. पावसाच्या संततधारेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील नगर अर्बन बँकेसमोर असलेला जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. मात्र तेथे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. जोरदार वाऱ्यांनी काही ठिकाणी झाडे उन्मळली.
दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात ढगफुटिसदृश्य पाऊस झाला. करंजी घाटातून खाली येणारे पाणी गावात घुसले. त्यामुळे अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ जणांची अहमदनगर महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने दोर, शिडीच्या साह्याने मुक्तता केल्याचे दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुराच्या पाण्यात वाहने व जनावरे वाहून गेल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी, जवखेडे, कासार पिंपळगाव या भागाचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. नगरहून शेवगावकडे मिरीमार्गे व तिसगावमार्गे जाणारी वाहतूक पुराच्या पाण्याने बंद पडली आहे. नगरहून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिचोंडी पाटील परिसरात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या कामामुळे चिचोंडी पाटील येथे तात्पुरता उभारलेला पूलही वाहून गेला आहे.
अतिवृष्टी झालेली मंडले
पारनेर तालुक्यातील निघोज व पळवे, श्रीगोंद्यातील श्रीगोंदे, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण, कोळगाव, आढळगाव, कर्जत तालुक्यातील राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, खेड, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, माणिकदौंडी या मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.