अहिल्यानगर: जिल्हा पोलीस दलाला पहिली मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे. तिचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. ही व्हॅन अहिल्यानगर ग्रामीण उपविभागीय पोलीस कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली.

या व्हॅनसोबत ८ जणांचे पथक, त्यामध्ये सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहायक, चालक व आणखी एक सहायक असणार आहे. ही व्हॅन २४ तास कार्यरत राहील. सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी पुरावे गोळा करण्याकरिता या व्हॅनचा उपयोग होणार असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

व्हॅनमध्ये तांत्रिक, रासायनिक, जैविक व भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी उपकरणे, त्यामध्ये ब्लड डिटेक्शन किट, सिमेन डिटेक्शन किट, नारकोटिक्स डिटेक्शन किट, गनशॉट डिटेक्शन किट व रेसिडोव्ह डिटेक्शन किट अशा विविध उपकरणांचा समावेश आहे. पुरावे गोळा करून ते सील केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याच प्रकारे छेडछाड करता येणार नाही यासाठी सिक्युरिटी ब्लॉक दिले आहेत, तसेच घटनास्थळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्र यासाठी स्वतंत्र उपकरण असणार आहे.

फॉरेन्सिक व्हॅनमुळे न्यायालयात गुन्हेगाराविरुद्ध भक्कम पुरावा उभा करण्यास मदत होईल. अनेकदा साक्षीदार ऐनवेळी फितूर होतात त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. विशेषत: सराईत गुन्हेगार ज्या पद्धतीने सुटण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीला यामुळे अटकाव बसणार आहे. भारतीय साक्ष अधिनियम-२०२४ मधील पुराव्याकरिता फॉरेन्सिक पुराव्यांची मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ही व्हॅन उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) यांच्याकडे तैनात असेल. नियंत्रण कक्षातील संदेशावरून ही व्हॅन घटनास्थळी पोहोचून तेथील तांत्रिक, रासायनिक, जैविक, भौतिक पुरावे गोळा करणार आहे. राज्यातील पोलीस दलाला एकूण २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यातील एक नगर जिल्ह्याला उपलब्ध करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यात सर्वाधिक क्षेत्रफळाचा आहे. तसेच जिल्ह्यातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात एकूण ३३ पोलीस ठाणे सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे आणखी एक फॉरेनसिक व्हॅन उपलब्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. फॉरेन्सिक लॅबमुळे गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ होईल अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.