सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्ले (ता. दोडामार्ग)येथील शेतकऱ्याचा बळी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या, पण सध्या ‘शांत’ आणि ‘माणसाळलेल्या’ ओंकार हत्तीला पकडण्याची मोहीम वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या ‘नो सिग्नल’मुळे थंड पडली आहे. विशेष म्हणजे, हा हत्ती सध्या अक्षरशः ‘नमस्कार, चमत्कार’ करत असल्याने, त्याला पकडण्यासाठी ‘नैसर्गिकरित्या’ अनुकूल वातावरण तयार झाले आहे, पण प्रशासकीय दिरंगाई मात्र कायम आहे.
मोहिमेत दिरंगाई: शासनाने ओंकारला पकडण्याचा निर्णय घेऊनही, सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक आणि कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांनी प्रस्ताव देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस आदेश (मंजुरी) मिळालेला नाही. वन कर्मचाऱ्यांच्या मते, ओंकार हत्ती सध्या इन्सुली, ओटवणे आणि वाफोली परिसरात अतिशय शांत आणि माणसाळल्यासारखा वागत आहे. तो कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आहे, त्यामुळे ट्रकमध्ये खाद्य दाखवून त्याला सहज पकडता येईल.नैसर्गिकरित्या पकडण्याचे अनुकूल वातावरण आहे.
धोकादायक प्रयत्न: आदेशाच्या प्रतीक्षेत असतानाही, वन कर्मचारी आणि हाकारे देणारे लोक ओंकारला मानवी वस्तीपासून दूर नेण्यासाठी मगरींचा वावर असलेल्या तेरेखोल नदी पात्रातून धोका पत्करून प्रयत्न करत आहेत.’नमस्कार-चमत्कार’ हत्तीची ‘वनवासा’तील गम्मत: ओंकार हत्तीने सध्या लोकांमध्ये ‘भक्ती’ आणि ‘उत्सुकता’ दोन्ही निर्माण केली आहे.
देवासारखा ओंकार: त्याने मडुरा आणि वाफोली येथे मंदिरासमोर जाऊन ‘नमस्कार’ केला, तर इन्सुली येथे तुळशी वृंदावनला ‘आलिंगन’ दिले. त्यामुळे काही लोक त्याला देवास्वरूप मानत आहेत आणि पायाच्या ठशांची पूजा करत आहेत.
’कल्याण’ आणि ‘नुकसान’: ज्यांनी त्याला आपुलकीने मार्ग मोकळा करून दिला, त्यांना संधी मिळाल्याचे बोलले जाते, तर ज्यांनी त्याला ‘शिव्या’ दिल्या, त्यांच्या शेती-बागायतीचे नुकसान त्याने केले. यामुळे नकारात्मक बोलणाऱ्यांना ‘पश्चात्ताप’ झाल्याची चर्चा आहे.
’वनतारा’ सज्ज, पण अधिकारी लोकांचे ‘वेट अँड वॉच’: ओंकार हत्तीला पकडण्याची जबाबदारी ‘वनतारा’ टिमला दिली जाणार आहे.पकडल्यानंतर ओंकारला ‘वनतारा’ प्रकल्पात ठेवले जाईल आणि नंतर कोल्हापूर घाटकर नगर येथील वन विभागाच्या कॅम्पचे काम पूर्ण झाल्यावर तिथे आणले जाईल.
आमदार दीपक केसरकर यांच्या इशाऱ्यानंतर यापूर्वीच एका मुख्य वनसंरक्षकाची बदली झाली असतानाही, आता पुन्हा एकदा मोहीम टाळली जात असल्याचे चित्र आहे. ‘नमस्कार, चमत्कार’ करणारा ओंकार हत्ती पकडला जाण्यासाठी सज्ज आहे, ‘वनतारा’ टीम तयार आहे, पण आपले वरिष्ठ अधिकारी लोक कागदी घोडे नाचवत बसले आहेत. तोवर, ओंकारचा ‘वनवासा’तील हा ‘ड्रामा’ सुरूच राहणार आहे.
