पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला प्रश्न
राज्यात शेतीविरोधी धोरणांमुळे ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना, कृषिमंत्री व काही आमदार ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेच कसे? त्यांच्या या हरकतीवरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारला कळवळा नसल्याचेच दिसून आल्याची टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सातारच्या वसंत व्याख्यानमालेत ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी काळाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी युनायटेड बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी होते. बापूसाहेब चाफेकर, प्रसाद चाफेकर, चंद्रकांत नलावडे, अशोक आठवले, रवींद्र शूटिंग यांची यावेळी उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद मोदी व सरकारवर विश्वास ठेवून तुरीचे उत्पन्न घेतले. गत २०१६ मध्ये ४ लाख ४४ हजार टन उत्पादन असलेल्या तुरीचे या खेपेस केवळ महाराष्ट्र राज्यातच २० लाख ३५ हजार टन उत्पन्न झाले. यातील केवळ ४ लाख टनच तूर सरकारने खरेदी करून आपली जबाबदारी झटकल्याचे सांगताना, १६ लाख टन तुरीचे करायचे तरी काय असा सवाल त्यांनी केला.
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना व जनतेला दिलेली आश्वासने आज ते जाणीवपूर्वक पाळत नाहीत. ही आश्वासनं पूर्ण करण्याबाबत सरकार साधा विचारही करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. सरकारच्या शेतीविरोधी धोरणांमुळे ९ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मतं मिळवण्यासाठी सरकारने तेथे कर्जमाफी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
देशाचा विकासदर १५ ते १६ टक्क्यांवर गेला पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सातबारा कोरा व्हायला हवा, शेतमालाला रास्त हमीभाव मिळायला हवा, सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हायला हवे, सरकार शेवटपर्यंत तूर खरेदी करेल, अशी आश्वासने देणारे भाजप सरकारने यातील कोणता शब्द पाळला असाही प्रश्न चव्हाण यांनी केला. पी.एन.जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रसाद चाफेकर यांनी केले.