अनिल देशमुख यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांवर सुरु असणारी आरोपांची मालिका काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी परमबीर सिंग यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. नागपूरच्या सावनेरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना उत्तरही दिलं तरीही अनिल देशमुख यांनी आरोप करायचं थांबवलेलं नाही. परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झालं होतं असा आरोप आता अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केला आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खरा आहे असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले. अनिल देशमुख पुढे म्हणाले, चांदीवाल समितीचाअहवाल आल्यानंतर काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदार देखील त्यांचाच पक्ष होता. त्यामुळे चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. त्यानंतर मागची दोन वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. ११ महिने चौकशी आणि चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा, अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचे पत्र देखील पाठवलं असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी जे आरोप केले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय? “अलिकडच्या काळात मी सगळ्यांचा लाडका झालो आहे. एक पोलीस आयुक्त ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्याच्या विरोधात विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन आरोप करुन नोकरी घालवण्यासाठी पुढे येईल का? अनिल देशमुख लपवाछपवी करतात. त्यांच्यावर असलेली केस भाजपाने टाकली नाही, केंद्र सरकारने टाकली नाही. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने हायकोर्टाने केस टाकली आणि त्यामुळे ते तुरुंगात गेले.” असं देवेंद्र फडणवीस असं म्हणाले. हे पण वाचा- Devendra Fadnavis : “चांदीवाल आयोगाचा अहवाल मविआच्या काळातच आला”, देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज अशाप्रकारे…” अनिल देशमुखांना सिंपथी मिळवायची आहे-फडणवीस अनिल देशमुख आता भाजपावर आणि माझ्यावर आरोप करत आहेत कारण त्यांना लोकांकडून सिंपथी मिळवायची आहे. बघा माझ्यावर कसा अन्याय झाला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे पण यांना जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे. यांच्या आरोपांवर बोलणं मी माझ्यासाठी कमीपणा समजतो. साळसूद आणि साव बनून जे फिरत आहेत. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान; म्हणाले,"माझ्याकडे पेन ड्राईव्ह, हिंमत असेल तर क्लिप." (संग्रहित छायाचित्र) अनिल देशमुख यांनी आता नव्याने केलेला आरोप काय? "मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना NIA मार्फत अटक होणार होती. त्यावेळेस फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले. असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी ( Anil Deshmukh ) केला आहे.