रत्नागिरी – रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत तब्बल २३ हजार मतदार बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेवून केला आहे. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी ही नावे वगळण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेना पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत तब्बल २३ हजार मतदार बोगस मतदार असल्याचा उघड झाले आहे. या बोगस मतदारांच्या जोरावर निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचा संशय आहे. आगामी निवडणुकां पुर्वी ही नावे तात्काळ वगळावित अशी मागणी माने यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘वोट चोरी’च्या वक्तव्याचा संदर्भ देत माने म्हणाले की, राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात मत चोरीचा मुद्दा मांडला, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या पायाखालची वाळू सरकली. आज आपण ही रत्नागिरी विधानसभेतील मतदार यादीतील तोच गंभीर प्रकार उघडकीस आणत असल्याचे सांगितले. याविषयीचे माझ्याकडील पुरावे असलेला पेन ड्राईव्ह प्रशासनाला देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

या बोगस मतदारांमध्ये दुबार नावे, ग्रामपंचायतीच्या पत्त्यावर असलेली संशयास्पद नावे अशा प्रकारांचा समावेश असल्याचे सांगत, निवडणुकीपूर्वीच आपण या बोगस मतदारांची यादी तत्कालीन अधिकाऱ्यांना दिली होती, असेही माने यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. अशा मतदारांची यादी मतदान केंद्रांवर लावून त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाईल, असे आश्वासन निवडणुकी वेळी देण्यात आले. मात्र तसे काही झाले नाही. यावेळी आपल्याच पक्षातील काही तत्कालीन जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बेईमानीमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे बूथ एजंट उपस्थित राहू शकले नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन या २३ हजार नावांपैकी अनेक नावांवर बोगस मतदान झाल्याच आरोप माने यांनी यावेळी केला.

आगामी निवडणुकांसाठी ६ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी या मतदार यादीत बोगस नावे वगळण्यात यावीत अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे.