परभणी : देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाने धार्मिक व जातीय द्वेष वाढवण्याचे राजकारण केले असून, या राजकारणाला खंबीरपणे विरोध करायचा असेल, तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका घेत आज गुरुवारी (दि. ७) राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता बाबाजानी दुर्राणी यांनी आज मुंबईत समर्थक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह परभणी जिल्ह्यातील माजी खासदार तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, रविराज देशमुख, अमोल देशमुख, नदीम इनामदार हे स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेशाचा ओघ सुरू असताना बाबाजानी यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करून वरपूडकरांच्या पक्षांतराच्या निमित्ताने झालेली पोकळी भरून काढली आहे. या वेळी बाबाजानी यांच्या समवेत पालिका, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध सत्तास्थानी काम केलेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशा सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजानी यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्याऐवजी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या प्रवेशाच्या कार्यक्रमात माजी खासदार तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकवर आणण्यासाठी सर्वजण मिळून परिश्रम घेऊ, असे या नेत्यांनी भाषणातून सांगितले. आपण आयुष्यभर पुरोगामी विचारांचे राजकारण केले असून, सध्या देशात व महाराष्ट्रात पुरोगामी विचार धोक्यात आला आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकवणे आवश्यक असून, जातीय व धार्मिक सलोखा कायम राखायचा असेल, तर काँग्रेसचा विचार बळकट करावा लागेल. त्यासाठीच आपला हा प्रवेश असल्याचे बाबाजानी यांनी सांगितले.