रत्नागिरी : कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे.  गौण खनिज उत्खननाचा  कर  (रॉयल्टी) न  भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना  नोटिस बजावण्यात आली आहे. या चार ही  कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी एवढा कर थकविला आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेगाने सुरु आहे. मात्र गेली चौदा वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे. याचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले. मात्र दुसऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. डिसेंबर २०२५ हा महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाचा कर  भरला नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासाठी महसुल विभागाने कोल्हापूरच्या येथील इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) कंपनीकडुन या उत्खननाचा सर्व्हे केला. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी) वांद्री (संगमेश्वर) येथे ५१ हजार ३३४ ब्रास जादा उत्खनन केले आहे. त्यामुळे त्यांना ३ कोटी ८ लाख कर भरावा लागणार आहे. चेतक इंटरप्रायझेस यांनी हडकरी (चिपळूण) येथे २ हजार ८६६  ब्रास उत्खनन केले आहे. १७ लाख कर  भरावा लागणार आहे. रवी इन्फ्रा या कंपनाने वांद्री (संगमेश्वर) येथीर ५८ हजार ६४६ ब्रास उत्खनन केले असून २ कोटी ३२ लाख कर भरावा  लागणार आहे.  जेएस म्हात्रे कंपनीने वांद्री (संगमेश्वर) येथे ६६ हजार ९१० ब्रास काळ्या दगडाचे उत्खनन केल्यामुळे त्यांना ४ कोटी रुपये कर भरावा लागणार आहे. एकुण साडे नऊ कोटी रुपये कर या कंपन्यांकडून थकविण्यात आला आहे.