राहाता: तालुक्यातील कोल्हार शिवारात आज, बुधवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एक महिन्याच्या कालावधीत कोल्हार परिसरातून एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. परिसरात आणखी काही बिबटे असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने वन विभागाने या भागात पुन्हा पिंजरा लावला आहे.
कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावांच्या संयुक्तरीत्या साठवण तलावाचे नवीन बांधकाम सुरू आहे. या भागात गेल्या एक-दोन महिन्यांपासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. या भागात आजूबाजूला सर्वत्र ऊस, फळबागा आदी पिकांचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे. स्थानिक रहिवासी शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन घडते.
बिबट्याच्या वास्तव्यामुळे स्थानिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने जिवाच्या भीतीने शेतीकामे करणे मुश्कील झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य बनले होते. या पार्श्वभूमीवर या भागात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आल्याने या एकाच ठिकाणी पिंजऱ्यात बिबटे अडकत आहेत. आज पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या आहे. मादी जातीचा अडीच वर्षे वयाचा हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन विभागाला सकाळी कळविण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा येथून नेला. या बिबट्याला माळशेजच्या जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी दिली.
पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. परिसरात अजूनही बिबट्याचे वास्तव्य असल्याने येथे दुसरा पिंजरा लावला आहे.