नारायणगाव : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे दुचाकीचालकांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. शनिवारी रात्री या घटना घडल्या. या घटनांनी परिसरात घबराहट पसरली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-ठाकरवाडी रस्त्यावरून संतोष पवार हे दुचाकीवरून घरी चालले होते. त्यांच्याबरोबर ललिता आदिती पवार (वय २५ ), साक्षी आदिती पवार (वय २), राधाबाई मधुकर वाघे ( वय ४८ ) हे होते. बिबट्याने अचानक हल्ला करून मागे बसलेल्या तिघांना जखमी केले.

पवार हे दुचाकी जोरात चालविल्यामुळे बचावले.या घटनेनंतर दहा मिनिटांनी याच रस्त्याने जात असताना आशुतोष बाळशीराम शेवाळे (वय २६) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच सचिन ढेरंगे आणि ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक उपचार करून चारही जखमींना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. ढेरंगे यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वनपाल एम. टी. मिरगेवाड, वनरक्षक एस. के. ढोले आणि बिबट कृती दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जखमींवर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वन परिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी सांगितले.या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.