दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- खळबळजनक! बलात्कार प्रकरणी साक्ष फिरवण्यास नकार देणाऱ्या साक्षीदाराच्या डोक्यात गोळी घालून खून; नागपूरमधील धक्कादायक घटना

नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून पंढरपूर मार्गे निघाले. मात्र, तत्पूर्वी त्यांनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केली.

साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा- मुंबईतील डॉक्टरांकडून शवविच्छेदन करा! ; नंदुरबारमधील महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी कुटुंबाची मागणी

पोलिसांनी केली साधूंची सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या साधूंच्या आधार कार्डची तपासणी केली. या साधूंकडे मिळालेले आधार कार्ड आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं. संपूर्ण चौकशीनंतर साधूंची सुटका करण्यात आली. हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी साधूंनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नाही. दरम्यान या प्रकाराची पोलीस महासंचालक रजनीश शेट यांनी तातडीने दखल घेतली असून या संपूर्ण प्रकाराबाबत तातडीने अहवाल देण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना दिले आहेत.