‘ निसर्ग’ वादळाचा मोठा फटका बसलेल्या मंडणगड तालुक्यातील सुमारे चार हजार ‘कुटुंबांचा वीजपुरवठा अजूनही सुरू होऊ शकलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वादळाचा सर्वाधिक तडाखा जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि गुहागर या तीन तालुक्यांना बसला. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्यामुळे ६२८ गावांमधील ४ लाख १४ हजार ६९४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या अधिकारी—कर्मचाऱ्यांनी गेल्या सव्वा महिन्यात अथक परिश्रम केल्याने सुमारे ९९ टक्के वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला. पण दापोली आणि मंडणगड तालुक्यांच्या दुर्गम भागात राहणाऱ्या सुमारे  ४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अजूनही बाकी आहे.

वादळामुळे रस्त्यावर पडलेले विजेचे खांब, वाहिन्या आणि मोठमोठय़ा झाडांमधून वाट काढत साहित्याची नेणे-आण करणे अत्यंत अवघड काम होते. मात्र या परिस्थितीत शक्य तितक्या लवकर शंभर टक्के वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणने पावले उचलली. पण अजूनही दापोली तालुक्यातील ३ व मंडणगड तालुक्यातील १३ गावांमधील चार हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे काम शिल्लक आहे. या १६ गावातील तांत्रिक बिघाड टप्प्याटप्प्याने दूर  करण्यात येत आहे. वादळामुळे नादुरुस्त झालेल्या ५ हजार ७०८ ट्रान्स्फार्मर पैकी५ हजार ६५७ ट्रान्सफार्मर दुरूस्त झाले आहेत. उच्च दाब वाहिनीचे ३३७५ विजेचे खांब पडले होते. त्यापैकी ३ हजार ५४ खांब बदलले आहेत. लघुदाब वाहिनीचे ५ हजार २४७ खांब बदलण्यात आले आहेत. आतापर्यत ९९.१ टक्के कामाची पूर्तता झाली आहे. त्यासाठी मुख्य अभियंता रंजना पगारे व अधिक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर महिनाभर वादळग्रस्त भागात तळ ठोकून होते. कोकण परिमंडळाच्या मागणीनुसार वरिष्ठ कार्यालयांनी देखील आवश्यक त्या साहित्याची उपलब्धता करून दिली आहे. ठेकेदाराबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर असून वादळामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान झालेले असतानाही त्यांनी दाखविलेल्या विश्वसावर यंत्रणेला काम करणे सोपे झाले.

महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांसह, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, कल्याण, पालघर येथील एकूण ५२ पथके वादळग्रस्त भागात कार्यरत होती. प्रत्येक पथकामध्ये अभियंत्यासह ८ कर्मचारी आहेत.  परजिल्ह्यातील एक पथक सात दिवसानंतर परत पाठवण्यात येत असून त्याऐवजी नवीन पथक  सहभागी होत आहे. रत्नगिरीतून आपल्या जिल्ह्यात परतल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना करोनामुळे अलगीकरण करून राहावे लागत आहे. तरीसुद्धा गेल्या सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत दुर्गम भागातील वीजपुरवठा ऐन पावसाळ्यात पुन्हा सुरळीत करण्याचे अवघड काम या पथकांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four thousand families in mandangad are still in darkness abn
First published on: 16-07-2020 at 00:16 IST